मुंबई : मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न करता प्रवेश प्रक्रिया करण्याच्या शासन आदेशानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून दुसरी प्रवेश यादी ४ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

आयटीआयची प्रवेश प्रक्रियाही ९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेल्या अंतरिम आदेशांपासून थांबली होती. या शैक्षणिक वर्षांतील प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण लागू न करता या प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमदेवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य़ धरण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर आता ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काळात चार प्रवेश फेऱ्या आणि एक समुपदेशन फेरी होणार असून ३१ डिसेंबपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी, ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून शुक्रवारी, ४ डिसेंबरला दुसरी प्रवेश यादी जाहीर होणार आहे. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर तिसरी प्रवेश यादी ११ डिसेंबर तर चौथी प्रवेश यादी १८ डिसेंबर रोजी जाहीर होईल. १९ डिसेंबरपासून समुपदेशन फेरीची प्रक्रिया सुरू होईल.

राज्यात खासगी आणि शासकीय संस्थांमध्ये मिळून १ लाख ४५ हजार ९६८ जागा उपलब्ध होत्या. पहिल्या फेरीत ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यापैकी २७ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते.