पत्रकार जे डे हत्याकांड प्रकरणी पत्रकार जिग्ना व्होराला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा दिला आहे. जिग्ना व्होरा विरोधात तपासयंत्रणेकडे पुरेसे पुरावे नाहीत असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं दिलेल्या जिग्नाच्या निर्दोषमुक्तीला सीबीआयनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी पॉल्सन जोसेफच्या दोषमुक्तीला देण्यात आलेलं आव्हान कायम आहे. विशेष मोक्का न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन उर्फ राजन सदाशिव निकाळजे समवेत ९ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर जोसेफ आणि जिग्ना दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

जिग्नाने जेडेंची तक्रार छोटा राजनकडे केल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता. जेडेंच्या दुचाकीचा नंबर आणि त्यांच्या घराचा पत्ता ही तिने दिला होता. छोटा राजनला जेडेविरोधात भडकावले आणि जोसेफच्या मोबाइलवरून दोन वेळा राजनशी बोलणेही झाले होते. परंतु, न्यायालयाने जोसेफ आणि जिग्ना दोघांनाही निर्दोष मुक्त केले होते.