सांगली मिरजमध्ये एकाच कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाल्याने जे. जे. रुग्णालयाच्या डीनवर अतिरिक्त जबाबादारी टाकण्यात आली आहे. डॉक्टर मानकर यांना जे जे रुग्णालयाचे प्रभारी डीन म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. मात्र त्याचप्रमाणे सांगलीतही ही संख्या वाढली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीत एकाच कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाली. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १७७ वर पोहचली आहे. सांगलीत एकाच कुटुंबात १२ जणांना लागण झाल्याची बातमी पसरताच इस्लामपूरमधला तो भाग बंद ठेवण्यात आला आहे. या भागातल्या कुटुंबातल्या एकालाच बाहेर पडण्याची संमती देण्यात आली आहे. त्याच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे.

जयंत पाटील यांनी व्यक्त केली चिंता

याबाबत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. “एकाच कुटुंबातले १२ जण पॉझिटीव्ह आढळल्याने इस्लामपुरात कडक निर्बंध पाळण्यात येणार आहेत. घरातून कोणीही बाहेर पडणार नाही. एकच व्यक्ती बाहेर पडणार, त्या व्यक्तीच्या हातावर स्टॅम्प मारण्यात येणार. जे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या घराजवळचे भाग बंद केले जाणार. त्या भागात कोणीही जायचं नाही. तिथे कुणाला खरेदी करायची असेल तरीही एकच व्यक्ती बाहेर जाणार.” असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान आज जे जे रुग्णालयाचे डीन यांच्यावर सांगलीचा अतिरिक्त भार देण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्ण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.