लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी निर्मीतीच्या करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयापाठोपाठ आता जे.जे. रुग्णालयातही होणार आहेत.

भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वदेशी निर्मित केलेल्या कोव्हॅक्सीन या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याने तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली आहे. दिल्ली, मुंबई, लखनऊ, पटना यासह १० राज्यात २५ ठिकाणी २८ हजार ५०० जणांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत. मुंबईत जे.जे. रुग्णालयाला तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे.

एक हजार स्वयंसेवकांवर या चाचण्या केल्या जाणार असून रुग्णालयाच्या एथिस्क समितीची परवानगीही प्राप्त झाली आहे. लवकरच स्वयंसेवकांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. यासाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी माहिती असलेली पत्रके रुग्णालय आवारात  लावली जातील. इच्छुकांनी यावर संपर्क करावा, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. स्वयंसेवकांमध्ये रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. ही लस दोन टप्प्यात दिली जाणार असून पहिला मात्रा दिल्यावर २८ दिवसांनी दुसरी मात्रा दिली जाईल. लस टोचण्याच्या प्रक्रियेला किमान दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. दरम्यान लो.टिळक रुग्णालयातील प्रस्तावित या लशीच्या चाचण्यांनाही एथिक्स समितीची मंजुरी दोन दिवसांत प्राप्त होणार असून पुढील डिसेंबरमध्ये चाचण्या सुरू होणार असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. मुंबईत सध्या ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविडशील्ड’ या लशीच्या चाचण्या मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात सुरू आहेत.

लशीसाठीचे निकष

  • १८ वर्षांवरील ज्यांना आजवर करोनाची बाधा झालेली नाही, करोनाबाधितांशी संपर्क झालेला नाही.
  •  कुटुंबामध्ये कोणाला करोनाची बाधा झालेली नाही.
  • इम्युनोसप्रेस औषधे घेत नाहीत आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे अन्य कोणतेही दीर्घ आजार नाहीत.