शिल्पकला विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम व पूरक अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) सुरू करण्याच्या मागणीसाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी सुरू केलेले आंदोलन लेखी आश्वासनानंतर गुरुवारी मागे घेण्यात आले. येथील शिल्पकला विभागातर्फे चालविला जाणारा ‘मास्टर्स इन फाइन आर्ट’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम अनेक वर्षांपासून बंद आहे. या अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत व शैक्षणिक सुविधा संस्थेकडे नसल्याने ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) या अभ्यासक्रमाची मान्यता काढून घेतली होती. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रम नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत असून तो लवकरात लवकर सुरू करावा, यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आहे.
या मागणीला सरकारदरबारी दाद दिली जात नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलनाचे अस्त्र उगारले. सर्व विद्यार्थ्यांनी दोन आठवडय़ांपासून वर्गात बसणे बंद केले होते. अखेर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढील वर्षांपासून पूरक व पदव्युत्तर असे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
या अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता निकषांच्या अटी एआयसीटीईने शिथिल केल्याने पुढील वर्षीपासून अभ्यासक्रम सुरू करण्यास अडचण येणार नाही, असे संस्थेचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांनी सांगितले. या शिवाय शैक्षणिक पात्रतेबाबतही येत्या आठवडय़ात सरकारी स्तरावर बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, असे आंदोलनकर्ता विद्यार्थी सतीश राणे याने सांगितले.