जे. पी. नड्डा यांचा भाजप पदाधिकारी-आमदारांना संदेश

शिवसेनेबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही याचा विचार करत न बसता आपल्याला सर्व मतदारसंघांत काम करायचे आहे हे लक्षात ठेवून विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांत तयारीला लागा, असा सूचक संदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना दिला.

जे. पी. नड्डा यांचे शनिवारी दुपारी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश प्रभारी सरोज पांडे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर व आमदार पराग आळवणी आदी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर दादर येथील वसंतस्मृती येथे नड्डा यांनी पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

लोकसभा निवडणुकीतील यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये शैथिल्य येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या जोमाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनेला कार्यरत करा.

प्रत्येक मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख यांना भेटून ते लोकांपर्यंत राज्य सरकारची कामे पोहोचवतील, सरकारी योजनांचे लाभ त्यांना मिळवून देतील याकडे लक्ष द्या. पक्षाची सदस्यता नोंदणी गांभीर्याने घ्या. या सर्व गोष्टींचा विधानसभा निवडणुकीत निश्चितच उपयोग होईल, असे नड्डा यांनी सांगितले.

कार्यसमितीची आज बैठक

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक रविवार २१ जुलैला गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे होणार असून या बैठकीचे उद्घाटन कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते होईल. बैठकीत नड्डा यांच्या मार्गदर्शनाबरोबरच नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षीय भाषण होईल. त्याशिवाय केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि प्रदेश प्रभारी सरोज पांडे हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होईल. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे हे राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत, तर प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर हे महाजनादेश यात्रेविषयी माहिती देतील.

प्रकाश जावडेकर ‘मातोश्री’वर :

भाजपच्या बैठकीला हजर राहण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत युती व्हावी यासाठीच्या वाटाघाटींमध्ये जावडेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. या पाश्र्वभूमीवर आता विधानसभेसाठी युतीच्या जागावाटपाचे आव्हान असताना जावडेकर-ठाकरे भेट महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपाचा तिढा कसा सोडवायचा याबाबत चर्चा झाल्याचे समजते.