एशियाटिक सोसायटीचे विश्वस्त जे. व्ही. नाईक यांची श्रद्धांजली
डॉ. अरूण टिकेकर यांनी आयुष्यात न्या. महादेव गोिवद रानडे तसेच गोपाळ गणेश आगरकर यांचा वैचारिक व सामाजिक वारसा पुढे चालविला. तसेच ‘लोकसत्ता’ला वृत्तपत्राबरोबरच ‘विचारपत्र’ असे स्वरूप त्यांनी दिले, असे प्रतिपादन एशियाटिक सोसायटीचे विश्वस्त प्रा. जे. व्ही. नाईक यांनी केले. तर डॉ. टिकेकर म्हणजे मूर्तिमंत ‘तारतम्य’ आणि ‘सारासार विचार’ असे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दात एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष शरद काळे यांनी टिकेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
एशियाटिक सोसायटीतर्फे शनिवारी सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष डी. आर. सरदेसाई आणि ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत व संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. टिकेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
न्या. महादेव गोिवद रानडे यांना आपला आदर्श मानणाऱ्या डॉ. टिकेकर यांनी आयुष्यात त्यांचा तसेच गोपाळ गणेश आगरकर यांचा वारसा जपला. साहित्य, संस्कृती, कला, इतिहास, वैचारिक आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केल्याचेही प्रा. नाईक म्हणाले.
डॉ. टिकेकर हे विद्वान, व्यासंगी, विचारवंत आणि मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रभावीपणे बोलणारे वक्ते होते. इतिहास, स्थानिक इतिहास व मुंबईचा इतिहास हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते, असे शरद काळे यांनी सांगितले.
माजी न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांनी, डॉ. टिकेकर हे माणूस म्हणूनही मोठे होते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ते उत्तम लेखन करत असत. कोणत्याही अडीअडचणीत सदैव सगळ्यांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र म्हणाले, मुंबई विद्यापीठ आणि एशियाटिक सोसायटी या दोन्हींवर त्यांचे खूप प्रेम होते.
या वेळी डॉ. डेव्हिड, डॉ. उषा ठक्कर, डॉ. मंगला सरदेशपांडे, योगेश कामदार, खंदारे, प्रियांका मेस्त्री, ए. जे. व्हिक्टर, प्रा. डॉ. मनीषा टिकेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.