शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या रविवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी जाहीर केले.

अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्यासाठी ३० सप्टेंबपर्यंत अंतिम मुदत होती. त्यानुसार डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांचे उमेदवार अर्ज दाखल झाले होते. या संदर्भात ७ नोव्हेंबरला परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर २० नोव्हेंबरला डॉ. पटेल यांचे नाव अध्यक्ष म्हणून कांबळी यांनी जाहीर केले होते.

दरम्यान अध्यक्षांच्या नावाची घोषणा कार्यकरिणीच्या बैठकीनंतर नियामक मंडळाच्या बैठकीपूर्वीच जाहीर करण्यावरून या प्रकरणी वादाला तोंड फुटले होते. ही प्रक्रिया नियमबाह्य़ असल्याचे सांगत हा वाद धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचला होता. नियामक मंडळाची मान्यता न घेताच हा निर्णय घेण्यात आल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता.

याबाबत कांबळी यांनी सांगितले, ‘परिषदेच्या घटनेतील कलमाप्रमाणेच कार्यकारिणीने एकमताने डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाची शिफारस नियामक मंडळाला केली होती. ते नाव आज नियामक मंडळाच्या बैठकीत घोषित करण्यात आले.’