करोनामुळे जगन्नाथ चाळीचा उत्सव साधेपणाने; समाजप्रबोधनाचे उपक्रम राबवण्याचा निर्धार

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : पारतंत्र्य काळात ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या चळवळींचे केंद्रस्थान आणि अनेक दिग्गजांची कर्मभूमी असलेल्या गिरगावातील जगन्नाथ चाळ यंदा १२५ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे. मुंबईमधील तिसरा सार्वजनिक गणेशोत्सव अशी ओळख बनलेल्या जगन्नाथ चाळीतील यंदाचा १२५ वा गणेशोत्सव करोनाच्या सावटामुळे अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

मंडळाच्या पहिल्या गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उपस्थित होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. व्याख्यानांच्या माध्यमातून चाळीत जनजागृतीचा महायज्ञ सुरू करण्यात आला होता. लोकमान्य टिळक, रा. रा. गजानन भास्कर वैद्य, संत वाङ्मयाचे अभ्यासक ल. रा. पांगारकर, न. चिं. केळकर, रावबहाद्दूर चिंतामणराव वैद्य, नाटय़ाचार्य कृ. प्र. खाडिलकर, संस्कृत पंडित डॉ. बेलवलकर, काशिनाथशास्त्री लेले, ल. ब. भोपटकर, अच्युतराव कोल्हटकर, बॅ. मोहम्मद अली जिना आदी मातब्बर व्यक्तींची व्याख्याने ऐकण्यासाठी चाळीमध्ये प्रचंड गर्दी होत असे. याच चाळीतील रहिवासी भास्कर यज्ञेश्वर खांडेकर आणि नरहरपंत जोशी पदे रचत आणि मेळे सादर करत. वेदशास्त्रामध्ये पारंगत असलेले कृष्णशास्त्री भाटवडेकर, ज्येष्ठ समाजसेवक साने गुरुजी, कवी के शवसूत, प्रख्यात इतिहास संशोधक त्र्यं. शं. शेजवलकर, नटवर्य भाऊराव दातार, ‘के सरी’चे बातमीदार अनंत ऊर्फ दाजीबा पिटकर, गायनाचार्य अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य गणपतराव बेहरे, प्रख्यात हार्मोनिअम वादक पी. मधुकर पेडणेकर अशा नामवंत व्यक्तींचे या चाळींमध्ये वास्तव्य होते. त्यामुळे जगन्नाथ चाळीतील गणेशोत्सवाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.

अनेक दिग्गजांचा राबता असलेल्या या पुराणवास्तूतील सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईमधील तिसरा गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. पारतंत्र्यातील गणेशोत्सवात खेळे, मेळे, कीर्तने, व्याख्याने, पोवाडय़ांनी चाळ गर्जत होती. पण यंदा करोनाच्या सावटामुळे मंडळाला सामाजिक उपक्रम रद्द करावे लागले आहेत. अत्यंत साधेपणाने, पण जुन्या आठवणींना उजाळा देत यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर विविध उपक्रम मंडळाने राबविले. पण यंदा मात्र सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत केवळ चाळीतील रहिवाशांसाठी समाजप्रबोधनपर कीर्तन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक भान राखून गर्दी होईल असे कार्यक्रम जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

देशभरात गुलामगिरीचे फास घट्ट आवळले जात असल्याने ब्रिटिशांविरोधात भारतीयांच्या विरोधात प्रचंड असंतोष धगधगत होता. त्याच वेळी अनेक वास्तू मुंबईत आकारास येत होत्या. त्या वेळचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक. स्थानकासाठी सुतारकाम करणारे जगन्नाथ सावे यांनी शिल्लक लाकूड साहित्य खरेदी केले आणि त्याचा वापर करून गिरगाव परिसरात १४ चाळी उभ्या केल्या. कामनिमित्त मुंबईत आलेले अनेक तरुण या चाळींच्या आश्रयाला आले. अनेक क्रांतिकारकांचा चाळीत राबता होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांनी भारावलेले काही तरुणही या चाळीत वास्तव्याला होते. या तरुणांनी धमरक्य संरक्षक संस्था स्थापन केली. आणि १८९६ मध्ये जगन्नाथ चाळीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली.