लेखक व परिनिरीक्षण मंडळात वाद
समकालीन दलित चळवळीच्या अनुषंगाने सामाजिक-राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या जनार्दन जाधव लिखित ‘जय भीम, जय भारत’ या नाटकाच्या संहितेमधील काही शब्द आणि संवाद वगळण्याची सूचना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने केली आहे. यातून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
‘आकार’ संस्थेतर्फे या नाटकाचे संहिता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी २३ नोव्हेंबरला मंडळाकडे पाठवण्यात आली होती. संहितेमधील १९ ठिकाणी विशिष्ट शब्द व संवादावर मंडळाने आक्षेप घेऊन ते वगळण्यास सांगण्यात आले आहे. दलित चळवळीची चिकित्सा करणाऱ्या या नाटकात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांबाबत भाष्य करणारे संवाद नाटकातील पात्रांच्या तोंडी आहेत. चळवळीतील कार्यकर्ते, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी व्यक्तिरेखा नाटकात दाखविण्यात आल्या आहेत. रमाबाई आंबेडकर नगर येथील मृत्युकांड, खैरलांजी प्रकरण आदींचा उल्लेख असून संवादात जातीयवाद, हिंदुत्ववाद अशा शब्दांचा समावेश आहे. या शब्दांना तसेच काही व्यक्तींच्या नावांना मंडळाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. हे शब्द वगळण्याबाबत कोणतीही कारणमीमांसा मंडळाकडून देण्यात आलेली नाही. आपण या संदर्भात मंडळाला लेखी निवेदन दिले आहे. याच विषयावरच्या इतर नाटकांना परवानगी मिळते तर आमच्या नाटकाला का नाही, असा प्रश्न उपस्थित करून मंडळ पूर्वग्रहदूषित वागत असल्याचा आरोप लेखक जनार्दन जाधव यांनी केला आहे.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांना विचारले असता ते म्हणाले, लेखक व दिग्दर्शक यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची मंडळाची तयारी आहे. नाटकाची संहिता मंडळातील चार सदस्यांना वाचण्यास दिली असून नियमानुसार नाटकातील आक्षेपार्ह शब्द व संवाद वगळण्यात येतील. कोणत्याही संहितेमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.