न्यायालयाचे आदेश असताना कारागृहांची अडेल भूमिका

मुंबई : वडिलांच्या अंत्यसंस्कारसाठी तीन तासांसाठी कारागृहाबाहेर पडलेल्या कै द्याची महिनाभर फरफट सुरू आहे. सत्र न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही अद्याप हा कैदी कारागृहात परतू शकलेला नाही.

हत्येच्या गुन्ह्य़ातील आरोपी व्यंकटेश हरिजन तीन वर्षांपासून ठाणे कारागृहात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारांसाठी सत्र न्यायालयाने त्याला तात्पुरता जामीन मंजूर के ला. पोलिसांच्या (सशस्त्र पोलीस ) बंदोबस्तात आरोपी व्यंकटेशला दुपारी एक ते चार या वेळेत गोरेगाव येथील स्मशानभूमीत सोडावे. तेथील कार्य आटोपल्यावर बंदोबस्तावर तैनात पोलिसांनी त्याला तातडीने कारागृहात सोडावे, कारागृहाने त्याला आत घ्यावे, असे आदेश होते.

व्यंकटेश ठाणे कारागृहाच्या बाहेर पडला खरा पण ठाणे कारागृहाने त्याला आत घेण्यास नकार दिला. त्यामुळे व्यंकटेशसाठी नेमलेल्या नेमलेल्या पोलीस पथकाने तळोजा कारागृह गाठले. तेथेही नकार मिळाला. चाचणी के ल्याशिवाय नवा कैदी घेणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानुसार पोलीस पथकाने व्यंकटेशला जेजे रुग्णालयात दाखल केले आणि सत्र न्यायालयाला कारागृहांच्या भूमिके बाबत माहिती दिली. व्यंकटेशला करोना संसर्ग नव्हता. हे अहवाल घेऊन गेल्यावरही तळोजा कारागृहाने त्याला आत घेण्यास नकार दिला. त्याला खारघर येथे उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले. दोन आठवडय़ांनंतर त्याला कारागृहात घेतले जाणार होते. मात्र महिला  लोटला तरी त्याला कारागृहात घेतलेले नाही, अशी तक्रोर हरिजन कुटुंबाने के ली आहे.

ठाणे कारागृहाने न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केलाच, पण कै द्याचा जीवही धोक्यात घातला. तीन दिवस व्यंकटेश सशस्त्र पोलिसांच्या ताब्यात होता, असा आरोप अ‍ॅड. प्रशांत गुरव यांनी केला. याबाबत तळोजा कारागृहाचे अधिक्षक कौस्तुभ कु र्लेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.