16 January 2018

News Flash

अंगणवाडी सेविकांचे राज्यव्यापी ‘जेल भरो’ आंदोलन

५० हजार सेविकांना अटक

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: October 6, 2017 2:01 AM

(संग्रहित छायाचित्र)

५० हजार सेविकांना अटक

गेले २३ दिवस सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपाचे सरकारने राजकारण सुरू केल्यामुळे संतप्त अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी राज्यव्यापी जेल भरो आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे पन्नास हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी स्वत:ला अटक करून घेतली असून पोलिसांकडे पुरेशा गाडय़ा नसल्यामुळे अनेकांना सोडून देण्याची वेळ आल्याचे ‘अंगणवाडी कृती समिती’चे म्हणणे आहे. शुक्रवारी मुंबईत आझाद मैदानावर हजारो अंगणवाडी सेविका जेलभरो आंदोलन करणार असून भाजप आमदारांना व्हॉटस्अ‍ॅप तसेच भाजपच्या फेसबुकवर यापुढे हजारोंच्या संख्येने दररोज ‘अंगणवाडी सेविका उपाशी, भाजप सरकार तुपाशी, मुख्यमंत्री न्याय हवा’ असे संदेश पाठवून सरकारला जाग आणली जाईल, असे अंगणवाडी कृती समितीने म्हटले आहे.

राज्यातील ९७ हजार अंगणवाडय़ांमध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी असून त्यांच्या माध्यमातून सहा वर्षांपर्यंतच्या ७३ लाख बालकांना पोषण आहार दिला जातो. त्याचप्रमाणे हजारो बालकांचे लसीकरण आणि तीन लाख गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना पोषण आहार देण्यात येतो. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकार पाच हजार व मदतनीसांना अडीच हजार रुपये देते. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते अंगणवाडी सेविकांना किमान दहा हजार रुपये मानधन मिळावे यासाठी समर्थन करायचे, आज तेच सत्तेत आल्यानंतर आठ हजार रुपये मानधनही देण्यास तयार नाहीत. याबाबत सनदशीर मागणी केल्यानंतर आम्ही संप पुकारला असून आता माघार नाही, असे अंगणवाडी कृती समितीचे निमंत्रक एम. ए. पाटील यांनी सांगितले.

जेल भरो आंदोलनाबरोबर समाज माध्यमांतूनही आंदोलन उभारू, असेही शुभा शमीम व एम. ए. पाटील यांनी सांगितले. गुरुवारी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नंदुरबारसह राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्य़ात हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका जेल भरो आंदोलनात सामील झाल्या होत्या. शुक्रवारी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका जेल भरो आंदोलन करणार आहेत.

First Published on October 6, 2017 2:01 am

Web Title: jail bharo movement by anganwadi workers
  1. No Comments.