संदीप आचार्य

मुंबईतील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून धारावीची परिस्थिती चिंताग्रस्त बनली असताना भारतीय जैन फाऊंडेशनने आज धारावीतील रुग्णांसाठी तब्बल २५ रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध करून दिली. एकीकडे मुंबईतील सर्व राजकीय पक्षांच्या रुग्णवाहिका गायब असताना पुण्यातील प्रसिद्ध समाजसेवक शांतीलाल मुथा यांच्या संस्थेने दिलेल्या रुग्णवाहिकांचे मोल ‘अनमोल’ म्हणावे लागेल. याचबरोबर गेले दोन महिने तब्बल ३०० मोबाइल दवाखान्यांच्या माध्यमातून राज्यातील हजारो रुग्णांवर उपचार करण्याचे कामही ‘भारतीय जैन संस्थे’च्या माध्यमातून सुरू आहे.

महाराष्ट्रात आता करोनाचे ३९,२९७ रुग्ण झाले असून मुंबईची रुग्णसंख्या २५ हजारांपेक्षा जास्त झाली आहे.  मे व जून अखेरीस मुंबईतील करोना रुग्णांची संख्या पन्नास हजाराहून अधिक झालेली असेल असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबई महापालिका व राज्य सरकारने करोनाचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवणे व संस्थात्मक क्वारंटाइनची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान असून या अतिरिक्त आरोग्य व्यवस्थेचे, नियोजन करण्यासाठी डॉक्टर व अन्य आरोग्य कर्मचारी उभारताना व्यवस्थेची पुरती दमछाक उडत असल्याचे पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एकीकडे रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत असताना रुग्णालयात खाटा मिळणे अवघड झाले आहे तर दुसरीकडे रुग्णवाहिका मिळत नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. मुंबईत आज १०८ क्रमांकाच्या सुमारे सव्वाशे रुग्णवाहिका असून बेस्ट व एसटीच्या काही बसेसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करून रुग्णसेवा केली जात आहे. मात्र ही व्यवस्था अत्यंत अपुरी असून शिवसेना, भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सह बहुतेक राजकीय पक्षांच्या तसेच सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका गायब झालेल्या दिसतात.

अशावेळी पुण्यातील भारतीय जैन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी धारावीसाठी दिलेल्या २५ रुग्णवाहिकांचे मोल ‘अनमोल’ म्हणावे लागेल. याबाबत शांतीलाल मुथा यांना विचारले असता ते म्हणाले, “गेल्या आठवड्यात महापौर निवासस्थानी झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत मला बोलावण्यात आले होते. यावेळी मुंबईसाठी रुग्णवाहिकांची मदत देण्यास मला सांगण्यात आले त्यानुसार आपण धारावीतील गंभीर स्थिती लक्षात घेऊन २५ रुग्णवाहिका दिल्या. यातील १८ रुग्णवाहिता रुग्णवाहिका आज प्रत्यक्ष सुरु झाल्या असून उर्वरित येत्या काही दिवसात धारावीत पोहोचतील. येथील करोना रुग्णांना बीकेसीतील आरोग्यसंस्थेत तसेच अन्य रुग्णालयात नेण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल” असेही शांतीलाल मुथा म्हणाले.

“करोनाची लागण देशात व राज्यात लागताच भारतीय जैन संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडूत मोबाईल दवाखाने सुरु करण्यात आले. आता आम्ही गुजरातमध्ये मोबाईल दवाखाने सुरू करणार आहोत” असे शांतीलाल मुथा यांनी सांगितले. “अंबरनाथ, कल्याण, ठाणे, मीरा भाईंदर, दादर, घाटकोपर, मुलुंड येथे मोबाईल दवाखान्यांच्या माध्यमातून २७ एप्रिल ते २० मे या कालावधीत १,३६,७१९ रुग्णांची तपासणी करण्यात आली तर २५५१ रुग्णांना पालिका व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची सर्व आकडेवारी आमच्या डॅशबोर्ड वर उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. पुण्यात आमचे ८२ मोबाईल दवाखाने सुरु असून राज्यातील २० जिल्ह्यात ३०० मोबाईल दवाखान्यांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यासाठी पन्नास डेपोडेपोतून काम चालवले जाते. एकट्या मालेगावमध्ये आमचे ११ मोबाईल दवाखाने सुरु आहेत”असेही शांतीलाल मुथा यांनी सांगितले.

गेली ३५ वर्षे शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात शांतीलाल मुथा यांचे काम सुरू असून काही वर्षांपूर्वी माळीण गावात डोंगर खचून संपूर्ण गाव गाडले गेले होते. केवळ शाळेत गेलेली मुले तेवढी या दुर्घटनेतून वाचली होती. या सर्व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शांतीलाल मुथा यांच्या संस्थेने घेतली एवढेच नव्हे तर या मुलांचे मानसिक पुनर्वसन करण्याचे कामही केले. यापूर्वी म्हणजे १९९३ साली लातुर भुकंपातील मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन, जबलपूर व गुजरातच्या भूज भुकंपातील मुलांच्या पुनर्वसनाचे मोठे काम शांतीलाल मुथा यांच्या संस्थेने केले आहे.

२००४ ची सुनामी असो की महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलेला दुष्काळी भाग असो या प्रत्येक ठिकाणी पुनर्सनापासून जलसंधारणापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कामात शांतीलाल मुथा यांच्या संस्थेने काम केलेले दिसते. करोनाच्या गेल्या दोन महिन्यात राज्यातील बहुतेक डॉक्टर आपले दवाखाने बंद करून बसलेले असताना ३०० मोबाईल दवाखान्यांच्या माध्यमातून ‘भारतीय जैन संस्था’ रुग्णसेवेचे व्रत चालवत आहे. “मुंबईतील वाढत्या रुग्णांची संख्या मला अस्वस्थ करत असल्याने आगामी काळात मुंबईत जास्तीतजास्त रुग्णोपयोगी काम करणार आहोत” असे शांतीलाल मुथा यांनी सांगितले.