जैन मुनींचे शिवसेनेला प्रत्युत्तर; मांसबंदीसाठी उपोषण

मासांहारविक्री बंदीच्या विरोधात जनमानसाची संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन तीनही महानगरपालिकांनी बंदी दोन दिवसांवर आणली असली तरी मांसबंदी कायम ठेवावी यासाठी भाईंदरमध्ये जैन साधूंनी एका दिवसाचे सामूहिक उपोषण केल्याने मांसाहारबंदीवरून सुरू असलेल्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. हिंदू धर्मातही अहिंसेचे तत्त्वज्ञान असून मराठी लोकही श्रावणात शाकाहार पाळतात, असे सांगत मांसविक्रीबंदीचे समर्थन जैन साधूंकडून करण्यात आले. मुस्लिमांशी तुलना केली गेल्याचा जैन साधूंनी तीव्र शब्दांत निषेध केला. मुंबईत आम्ही पहिल्यापासून आहोत, मुंबईच्या विकासात जैन यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे कोणीही मुंबईवर मालकी गाजवू नये, असे जैन धर्मगुरू सागरचंद्र सुरीश्वर यांनी ठणकावले. त्यातच शनिवारी भाईंदर येथे जैन साधूंनी एक दिवसाचे उपोषण करून मांसाहारबंदी कायम ठेवण्याची मागणी केली.

पर्युषण पर्वात मांसविक्री बंदी करण्याचा निर्णय मुंबई, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर पालिकेने घेतल्यावर त्याला शिवसेना आणि मनसेकडून जोरदार विरोध करण्यात आला.
या निर्णयाविरोधात नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन तीनही पालिकांनी ही बंदी दोन दिवसांवर आणली. त्याचवेळी मनसेने मांसविक्री बंदी धुडकावत रस्त्यावर आंदोलन केले. जैन यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातूनही सडकून टीका करण्यात आली.
आम्ही मांसाहार बंदीची मागणी करत आहोत. याचा अर्थ आम्ही कोणाच्या विरोधात आहोत, असा होत नाही, असे धर्मगुरू आचार्य सागरचंद्र सुरीश्वर म्हणाले.