‘मेट्रो ३ची कारशेड आरेमध्ये झाली नाही तर, अन्यत्र होणारच नाही ही हटवादी भूमिका आहे. तज्ज्ञांनी सुचवलेल्या इतर पर्यायांचा विचारही झाला पाहिजे. कारशेड ही सुरुवात असून पाठोपाठ आरेमध्ये आणखी प्रकल्पांसाठी दरवाजे खुले होतील आणि आरे संपवले जाईल’, अशी टीका माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी केली. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास आरेमध्ये कारशेड होणार नाही, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

आरेमधील मेट्रो ३ च्या कारशेडसाठी २६४६ झाडे हटवण्याच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात गेले पंधरा दिवस मुंबईत तीव्र निदर्शने होत आहेत.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी आरे वसाहतीत जयराम रमेश यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. मुंबईसारख्या महानगरासाठी मेट्रो गरजेची असल्याचे मान्य करत कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार करायची गरज आहे असे ते म्हणाले. ‘विकास आणि पर्यावरण यांचा संतुलित विचार करून या प्रश्नावर मध्यममार्ग शोधावा लागेल. त्यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. मी केंद्रात असताना नवी मुंबई विमानतळाबाबत असा हस्तक्षेप केला होता, असे रमेश म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कारशेडबाबतच्या भूमिकेचे कौतुक करून यापुढे त्यांनी सहकारी पक्षाला हे समजावून सांगण्याची गरज असल्याची टिप्पणी जयराम रमेश यांनी केली. पंतप्रधान जगभर पर्यावरणावर भाष्य करतात, मात्र त्यांचे बोलणे आणि वागणे यात विसंगती दिसून येते असे ते म्हणाले.

जयराम रमेश यांची नुकतीच संसदेच्या वने आणि पर्यावरण स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसचा यासंदर्भात पुढचा टप्पा काय असेल यावर ते म्हणाले की,  हा विषय संसदेच्या वने आणि पर्यावरणाच्या स्थायी समितीपुढे मांडला जाईल. तसेच संजय निरुपम पंतप्रधानांकडे यासंदर्भात शिष्टमंडळ घेऊन भेटतील असे त्यांनी सांगितले.