मुंबईसह देशातील सात रेल्वे स्थानके आणि सहा राज्यातील मंदिरामध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली आहे. हरयाणातील रोहतक रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना ‘जैश’च्या धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात ८ ऑक्टोबरपर्यंत सहा राज्यातील मंदिरांमध्ये स्फोट करणार असल्याचे म्हटले आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान भारतात अतिरेकी कारवाया करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची गुपचूप तुरूंगातून सुटका केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. मागील महिन्यात गुजरातमधील कच्छमध्ये एक संशयित बोट लष्कराला सापडली होती. त्यानंतर नौदल प्रमुखांनीही समुद्रमार्गाने दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर हरयाणातील रोहतक रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना ‘जैश’च्या धमकीचे पत्र मिळाले आहे. रोहतक रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार हे पत्र रोहतक रेल्वे जंक्शन अधीक्षकांच्या नावे पाठवण्यात आले आहे. स्थानक व्यवस्थापकांना शनिवारी ३ वाजता हे पत्र मिळाले. या पत्रावर मसूद अहमद याने पाकिस्तानमधील कराचीतून पाठवल आहे”, असे पोलिसांनी सांगितले.

या पत्रात ८ ऑक्टोबरपर्यंत देशातील सहा राज्यातील मंदिरे आणि रेल्वे स्थानकांमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यात मुंबईसह रोहतक, हिसार, चेन्नई, जयपूर, भोपाळ आणि कोटा या रेल्वे स्थानकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वहीच्या पानावर हे पत्र लिहिलेले असून, सरकारी यंत्रणांकडून या पत्राची सत्यता पडताळणी केली जात आहे. दरम्यान, बॉम्बस्फोट घडवण्याचे धमकीचे पत्र मिळाल्यानंतर रोहतक रेल्वे स्थानकातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच पत्रात उल्लेख करण्यात आलेल्या ठिकाणांचीही सुरक्षाही वाढवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaish e mohammed threatens to blow up railway seven stations and temple including mumbai bmh
First published on: 16-09-2019 at 12:27 IST