घरकुल घोटाळ्यातील आरोपी आणि माजी राज्यमंत्री सुरेशदादा जैन यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित असतानाही सरकारी परवानगीची गरज नाही, असे खोटे वक्तव्य जळगाव सत्र न्यायालयात केल्याप्रकरणी  विशेष सरकारी वकील एन. डी. सूर्यवंशी अडचणीत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावत कशाच्या आधारे वक्तव्य केले हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करावे असा आदेश देत कारवाई करण्याचा इशारा दिला.
जळगाव सत्र न्यायालयात घरकुल घोटाळ्याचे प्रकरण सुरू असून, गेल्या मे महिन्यात सूर्यवंशी यांनी जैन यांच्यावरील कारवाईच्या मंजुरीबाबतच्या प्रस्तावाप्रकरणी खोटे वक्तव्य केल्याचा आरोप जैन यांनी याचिकेद्वारे केला आहे. जैन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मंजुरीची गरज नसल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे सूर्यवंशी यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या पाश्र्वभूमीवर सत्र न्यायालयाने जैन यांच्यासह अन्य आरोपींवर आरोप निश्चित केले होते. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. फौजदारी दंडसंहितेच्या कलम १९७ नुसार आमदारावर कारवाई करण्याकरिता सरकारची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाचा आपल्यावर आरोप निश्चित करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा दावा जैन यांनी याचिकेत केला आहे.
सूर्यवंशी यांनी न्यायालयात खोटे वक्तव्य केल्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ जैन यांनी माहिती अधिकाराअंतर्गत सरकारकडून मागविलेले पत्र न्यायालयात सादर केले. नऊ डिसेंबरच्या पत्रामध्ये जैन यांच्यावरील कारवाईला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचा आणि त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे म्हटले आहे. या पत्राची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी सूर्यवंशी यांना नोटीस बजावून कशाच्या आधारे त्यांनी मंजुरीच्या प्रस्तावाबाबतचे वक्तव्य केले हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. जैन यांनी सादर केलेल्या पत्रावरून प्रथमदर्शनी तरी सूर्यवंशी यांनी सत्र न्यायालयात खोटे वक्तव्य केल्याचे आणि हे प्रकरण वरवरचे दिसत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. शिवाय सूर्यवंशी यांनी आठ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण दिले नाही, तर त्यांच्याकडे कुठलेच स्पष्टीकरण नाही असे मानून त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील, असेही न्यायालयाने बजावले.