शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून उद्विग्न होऊन आपल्या शेतात पिकवलेला कोबीचा मळा शेतकऱ्याने फावड्याने उध्वस्त केला होता. जालना जिल्ह्यातील पोहेगाव येथील प्रेमसिंग चव्हाण या शेतकऱ्याचा कोबीचा मळा उध्वस्त करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता. या शेतकऱ्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून त्यांनी त्याला मुंबईतील मातोश्रीवर बोलावले. विशेष म्हणजे त्यांनी या शेतकऱ्याला धीरही दिली आहे. याबरोबरच स्मृती प्रतिष्ठानतर्फे या शेतकऱ्याला आर्थिक मदत देऊ केली आहे.

चव्हाण हे कोबी आणि टोमॅटोची शेती करतात. फळभाज्यांचे भाव पडल्याचा फटका प्रेमसिंग यांना देखील बसला. भाव मिळत नसल्याने प्रेमसिंग निराश झाले होते. वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने प्रेमसिंग यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी फावड्याने कोबी आणि टोमॅटोची शेतीच उद्ध्वस्त केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कोबी लागवडीसाठी त्यांना सहा हजार रुपयांचा खर्च आला. त्याला अडीच हजार रुपयांच खत, तीन हजार रुपयांची खुरपणी आणि कीटकनाशकांसाठी दोन हजार रुपये असा साडेतेरा हजाराचा खर्च झाला. अर्ध्या एकरात त्यांना चार क्विंटलचे कोबीचे उत्पादन मिळाले. परतुरच्या बाजारात हा कोबी विक्रीसाठी घेऊन गेले. त्यासाठी रिकामे कट्टे आणि गाडीभाड्यासाठी पाचशे रुपयांचा खर्च आला. मात्र कोबीला एक रुपयांचा भाव आला.

VIDEO: कोबी, टोमॅटोला भाव मिळेना, निराश शेतकऱ्याने फावड्याने केली शेती उद्ध्वस्त

यातही पूर्ण कोबी विकला न गेल्याने काही कोबी फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मेहनतीचा मोबदला तर मिळाला नाहीच पण लागवडीसाठी झालेला खर्चही न निघाल्याने संतापलेल्या प्रेमसिंग यांनी फावड्याने स्वतःच्या हातानं शेतातील कोबीच पीक उद्धवस्त केलं. आता या हताश शेतकऱ्याला शिवसेनेकडून मदत करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए .जे बोराडे, पंडित भुतेकर, पांडुरंग डोंगरे ,रमेश शेळके आदींची उपस्थिती होती.