मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेले दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा पाढा वाचला. मुख्यमंत्री फडणवीस व दानवे यांच्या उद्याच्या ‘मातोश्री’वरील बैठकीत जालन्याच्या मुद्दय़ावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील संघर्ष पराकोटीला गेल्याने खोतकर यांनी दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले. खोतकर यांचा राग शांत करून त्यांची समजूत काढण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मध्यस्थ म्हणून जालन्यात धाव घेतली. देशमुख-दानवे यांनी खोतकरांच्या घरी हजेरी लावल्यानंतरही खोतकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री खोतकर यांना ‘वर्षां’ बंगल्यावर बोलावून घेतले. आता युती झाली आहे. राग सोडा एकत्र काम करू, असे फडणवीस यांनी त्यांना सांगितले. त्यावर आम्हीपण युतीतच होतो ना, मंत्रीही होतो. मग अन्याय का केला. जालन्यात शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास का दिला, असा सवाल खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला.  बुधवारी खोतकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दानवे यांनी जालन्यातील शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला, खोटय़ा गुन्ह्य़ांत अडकवले याचा पाढा त्यांनी ठाकरे यांच्यासमोर वाचला. त्यावर फडणवीस आणि दानवे भेटायला येणार आहेत. त्या वेळी यावर निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी खोतकर यांना सांगितले.

उद्धव ठाकरे यांचा निर्णय मान्य असेल, असे अर्जुन खोतकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.