टॅंकरच्या वापरात चार हजारांनी घट; कोल्हापूर, सोलापूर, लातूर, अकोला जिल्ह्य़ात एकही टॅंकर नाही

राज्य शासनाच्याच जलयुक्त शिवार योजनेत दरोडोखोर शिरल्याचे वक्तव्य करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय खळबळ उडवून दिली असली, तरी या योजनेमुळे एका वर्षांत राज्यातील सात हजार टंचाईग्रस्त गावे टॅंकरमुक्त झाली आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत कडक उन्हाळ्यातही टॅंकरच्या वापरात चार हजाराने घट झाली आहे. कोल्हापूर, सोलापूर, अकोला व लातूर या जिल्ह्य़ांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी एकही टॅंकर वापरला जात नाही.

गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाचे सर्वाधिक चटके सहन करावा लागणाऱ्या मराठवाडय़ातील परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद या जिल्ह्य़ांमध्येही टॅंकरची संख्या मोठय़ा प्रमाणावर कमी झाली असून, सध्या फक्त चार-दोन टॅंकरचाच वापर केला जात असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. राज्यात मागील काँग्रेस आघाडी सरकारनेच लहान-लहान बंधारे बांधून पाणी साठविण्याची योजना सुरु केली. नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने, जलयुक्त शिवार या नावाने ही योजना पुढे चालू ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षांत २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात मोठय़ा प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेची कामे हाती घेण्यात आली.

मंत्रालयातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, जलयुक्त शिवार योजनेसाठी ११ हजार ४९४ गावांची निवड करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत नवीन बंधारे बांधणे, अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे अशी जवळपास ३ लाख ३५ हजार ७८५ कामे पूर्ण करण्यात आली. त्यापैकी ८ हजार ६७१ कामांमध्ये लोकांनी सहभाग दिला. लोकांच्या श्रमदानातून ५३८ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. आतापर्यंत या योजनेवर ४ हजार ९५४ कोटी रुपये खर्च झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून सुमारे १२ लाख घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. तर, ६ लाख २८ हजार ५१२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिना संपला की, राज्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा टॅंकरने पुरवठा करावा लागत होता. गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत बांधण्यात ओलल्या लहान बंधाऱ्यांमुळे पाणी साठविण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे तब्बल ६ हजार ९५० गावे टॅंकरमुक्त झाली. गेल्या वर्षां मे महिन्यात ११ हजार ३८१ गावांना ५ हजार ४२३ टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागला. यावेळी ४ हजार ४३१ गावांना ११९६ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. दोन्ही वर्षांतील मे महिन्यातील ही आकडेवारी आहे.

ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, या जिल्ह्य़ांमधील टॅंकरची संख्या मोठय़ा प्रमाणावर कमी झाली आहे. परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्य़ात केवळ चार-दोन टॅंकरचा वापर केला जात आहे. तर, सोलापूर, लातूर, कोल्हापूर व अकोला या जिल्ह्य़ात सध्या एकही टॅंकर नाही.