मद्यपान करून वाहन चालवून मुंबईतील पूर्व मुक्त मार्गावर दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या जान्हवी गडकर हिच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. जान्हवी गडकर हिला न्यायालयाने २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर तिच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला.
मद्यपान करून ऑडी गाडी चालविणाऱ्या जान्हवी गडकरने गेल्या सोमवारी मुक्त मार्गावर चुकीच्या मार्गिकेतून गाडी नेली आणि एका टॅक्सीला धडक दिली. या अपघातात दोन जण ठार झाले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेने पोलिसांना सादर केलेल्या अहवालात जान्हवीने निर्धारित प्रमाणापेक्षा चौपट मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. १०० मिलिलिटर रक्तात ३० मिलिग्रॅम अल्कोहोल असण्यास मान्यता आहे. मात्र, जान्हवीच्या रक्तात हेच प्रमाण १२० मिलीग्रॅम एवढे आढळले.