१६ लाख रुपयांची जादा कमाई

प्रवाशांना आणि खास करून पर्यटकांना कोकणातील निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील जनशताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम (काच असलेला पारदर्शक डबा) डबा जोडण्यात आला. १८ सप्टेंबर २०१७ पासून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेला प्रवाशांनी ‘पारदर्शक’तेने प्रतिसाद दिला आहे. मुंबईतून जाताना डब्याच्या एकूण क्षमतेपेक्षा सरासरी ८७ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. तर १५ लाख ९५ हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

व्हिस्टाडोम डब्याची बांधणी चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरी) करण्यात आली आहे. काचेचे छत असलेला हा डबा मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार १८ सप्टेंबरपासून दादर-मडगांव जनशताब्दीला डबा जोडण्यात आला. ४० आसने असलेल्या डब्यात काचेच्या मोठय़ा खिडक्या, १२ एलसीडी, एक फ्रिज आणि फ्रीजर, एक ओव्हन यासह प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी आणि निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पारदर्शक डब्यातील दादर ते मडगाव प्रवासासाठी दोन हजार २३५ तर रत्नागिरीपर्यंतच्या प्रवासासाठी एक हजार ४८० रुपये तिकीट दर आहेत. प्रवाशांसाठी खाद्यपदार्थाची रेलचेल ठेवण्यात आली आहे. व्हिस्टाडोम सेवेत येताच सुरुवातीला कमी प्रतिसाद होता. १८ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबपर्यंत मुंबईतून जाताना एकूण ५२९ प्रवाशांनी त्यातून प्रवास केला आणि ९ लाख १३ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. या काळात एकूण एक हजार ५२० प्रवासी प्रवास करतील, अशी आशा होती. परंतु आता प्रतिसाद वाढला आहे. आतापर्यंत एकूण ९३४ प्रवाशांनी विस्टाडोममधून प्रवास केल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले.

  • ३० सप्टेंबर आणि १२, १९, २१, २३, २६, २८ ऑक्टोबर तसेच २ आणि ४ नोव्हेंबर रोजी प्रवाशांकडून व्हिस्टाडोमला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तर बाकीच्या दिवशी पाच ते सहा आसने रिकामी राहात होती, असे जैन म्हणाले.
  • मडगाव ते दादर जनशताब्दीला जोडण्यात आलेल्या व्हिस्टाडोम डब्याची २५ ऑक्टोबरनंतरची माहिती रेल्वेकडून उपलब्ध होऊ शकली नाही. ३८६ प्रवाशांनी प्रवास करतानाच सहा लाख ७५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. हे पाहता मध्य रेल्वेला एकूण २१ लाखांहून अधिक उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले.