पाश्चात्त्य वृत्ती-प्रवृत्तींना नकार देत ‘देशीवादी’ भूमिका घेणारे आणि ‘कोसला’, ‘बिढार’, ‘जरीला’, ‘झूल’, ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘जनस्थान’ पुरस्कार रविवारी जाहीर करण्यात आला.
एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजे मराठी भाषा दिनी २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या सोहळ्यात नेमाडे यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यंदाचा हा बारावा जनस्थान पुरस्कार असून आतापर्यंत विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल, ना. धों. महानोर, महेश एलकुंचवार आदी मान्यवर साहित्यिक-नाटककार-कवी-समीक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.