मुंबईतील करोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. जवळपास दहा हजारांच्या आसपास दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं बेड मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. बेड उपलब्ध व्हावेत यासाठी महापालिकेनं उपाययोजना हाती घेतल्या असून, हॉटेल्समध्येही क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहेत. यातच दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय संपूर्णत: करोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. काही तासांत हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयातील बेडच्या मागणीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेनं दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय संपूर्णत: करोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे जसलोक रुग्णालयात करोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना दाखल केले जाणार नव्हते. तसेच सध्या असलेल्या करोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांनाही इतर रुग्णालयांत हलविण्यात येणार होते. शनिवारी सकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच महापालिकेनं आपला निर्णय मागे घेतला आहे.

महापालिकेच्या निर्णयानंतर जसलोक रुग्णालयाने कोविड रुग्णांसाठीच्या बेडमध्ये वाढ करण्याचं आश्वासन महापालिकेला दिलं. रुग्णालयात सध्या करोना रुग्णांसाठी सध्या ५८ बेड असून, ते १५० बेडपर्यंत वाढवण्याची तयारी जसलोक रुग्णालयाच्या प्रशासनाने दर्शविल्यानंतर महापालिकेनं जसलोक पूर्णतः कोविड रुग्णालय करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

करोनाच्या संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात जसलोक रुग्णालयाने करोना रुग्णांची देखभाल अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या लाटेच्या वेळी महापालिकेने या रुग्णालयाला संपूर्ण करोना रुग्णालयाचा दर्जा देण्याचे ठरवले होते. त्यादृष्टीने पालिकेनं जसलोक रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला निर्देश दिले होते. या प्रक्रियेमुळे मुंबईत करोना रुग्णांसाठी २५० बेड वाढणार होते.