सुरक्षा उपाययोजनांकडेही दुर्लक्ष

एखाद्याने अनधिकृत बांधकाम करायचे आणि नंतर पालिका दरबारी दंड भरून ते नियमित करायचे असा मुंबईत पायंडा पडला आहे. आता त्याच धर्तीवर पालिकेकडून कोणतीही परवानगी मिळालेली नसताना मैदानामध्ये बच्चेकंपनीसाठी भलीमोठ्ठी जत्रा भरवायची आणि पालिकेने कारवाईची नोटीस बजावल्यावर दंड भरून आवश्यक त्या परवानग्या मिळवायच्या अशी नवी प्रथा सुरू झाली आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे बोरिवलीमधील पुष्पांजली उद्यान मैदानावर भरलेली भव्य जत्रा. दंडात्मक रक्कम भरल्यानंतर आयोजकाला पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोणत्याही सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचीही तसदी आयोजकांनी घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

बोरिवलीमधील चंदावरकर मार्गावरील पुष्पांजली मैदानावर १ एप्रिल ते २३ मे या कालावधीत बच्चेकंपनीसाठी एक जत्रा (अ‍ॅनिमेटेड अ‍ॅनिमल अ‍ॅम्युझमेन्ट अ‍ॅण्ड कन्झ्युमर ट्रेड फेअर) भरविण्यात आली आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाइट हाऊस’ची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. लाकूड, कागद अशा ज्वालाग्राही वस्तूंपासून ही प्रतिकृती बनविण्यात आली आहे. याशिवाय लहान मुलांसाठी आकाश पाळणे, ट्विस्टर व्हील, छोटेखानी विमान, छोटी झुकझुक गाडी आदी विविध प्रकारची खेळणी मैदानात आहेत. याशिवाय हलणाऱ्या, डोलणाऱ्या प्राण्यांच्या प्रतिकृती, सेल्फी पॉइंट्स आदी एका मोठय़ा शामियान्यात उभारण्यात आले आहेत. याशिवाय हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, खाद्यपदार्थाचे स्टॉल्सही जत्रेमध्ये आहेत. प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती ७० रुपये असून प्रत्येक खेळासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येत आहे.

सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी आहे. गावाला जाऊ न शकलेल्या बोरिवली आणि आसपासच्या उपनगरांमधील मुलांना ही जत्रा पर्वणी ठरली आहे. मात्र पोलीस, अग्निशमन दल, तहसीलदार कार्यालयाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न घेताच हा सगळा थाट मांडण्यात आला होता. खाद्यपदार्थ शिजविण्यात येत असल्याने आयोजकांनी अग्निशामक यंत्रणेची सोय करायला हवी. ती योग्य पद्धतीने केली आहे की नाही हे पालिकेकडून तपासून घेऊन ना हरकत घ्यायला हवी होती. मात्र हे न करताच आयोजकांनी जत्रेला सुरुवात केल्याने येथील जागरूक नागरिकांनी त्यावर आक्षेप घेतला.

परवानगी नसतानाही जत्रा सुरू करण्यात आल्यामुळे पालिकेच्या ‘आर-मध्य’ विभाग कार्यालयाने आयोजकावर नोटीस बजावली आणि एक लाख ३५ हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. आयोजकाने दंडाची रक्कम भरली. आयोजकाने परवानगीसाठी अर्ज केला होता. अग्निशमन दल, पोलीस आणि तहसीलदारांनी ‘ना हरकत’ दिल्यानंतर पालिकेने परवानगी देऊन टाकली. त्यामुळे आता या जत्रेला अनधिकृत म्हणता येत नाही. परंतु आधी जत्रा सुरू करायची आणि पालिकेची नोटीस हाती पडल्यानंतर दंड भरायचा आणि नंतर परवानग्या मिळवायच्या अशी नवी प्रथा या जत्रेच्या माध्यमातून सुरू होऊ पाहात आहे.

नियम धाब्यावर

मैदानामध्ये कोणताही कार्यक्रम आयोजितकरावयाचा झाल्यास त्यासाठी पालिका, स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. पालिकेचा आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, कीटकनाशक विभाग, अनुज्ञापन विभाग, इमारत आणि प्रस्ताव विभाग, अग्निशमन दल आदींकडून परवानगी घेण्याची आवश्यकता असते. पोलीस, अग्निशमन दल आणि तहसीलदारांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पालिकेकडून मैदानातील कार्यक्रमांना परवानगी दिली जाते. त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडूनही परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र आयोजकांनी कोणतीही परवानगी मिळालेली नसताना नियम धाब्यावर बसवून पुष्पांजली उद्यान मैदानामध्ये जत्रेचे आयोजन केले.

पुष्पांजली मैदानात जत्रा सुरू करण्यासाठी आयोजकांनी पालिकेकडे अर्ज केला होता. मात्र पोलीस, तहसीलदार आणि अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे आयोजकांना जत्रेसाठी परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र तरीही आयोजकाने जत्रा सुरू केली. त्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

रमाकांत बिरादर, साहाय्यक आयुक्त, आर-मध्य विभाग कार्यालय

परवानगी मिळावी यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता, मात्र काही आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यास विलंब झाला. त्यामुळे पालिकेकडून जत्रेसाठी परवानगी मिळविण्यास विलंब झाला. मात्र आता सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत.

विजय पिंटो, जत्रा आयोजक