सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते या पदाची सूत्रे हाती घेणार असल्याचे समजते.
दरम्यान, केंद्रीय गुप्तचर विभागातील वरिष्ठ अतिरिक्त पोलीस महासंलक दत्ता पडसाळगीकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर जावेद अहमद यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी ते गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. जावेद अहमद हे ३९ वे पोलीस आयुक्त ठरले होते. आता जावेद अहमद यांनी सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सौदी अरेबिया सरकारकडून जावेद अहमद यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आल्यानंतर त्याबाबतची औपचारिक घोषणा शुक्रवारी करण्यात आली.

नवे आयुक्त कोण?
रिक्त झालेल्या मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी दत्ता पडसाळगीकर, संजय बर्वे, सतीश माथूर, सुबोध जैस्वाल आदींची नावे चर्चेत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील म्हणून ओळखले जाणारे दत्ता पडसाळगीकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.