‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात जावेद अख्तर यांचे परखड मत; नामवंतांची उपस्थिती

श्रद्धा आणि विश्वास या दोन भिन्न गोष्टी आहेत. विश्वास हा अनेक कसोटय़ांवर सिद्ध करता येऊ शकतो, पण कोणत्याही कसोटीवर सिद्ध होऊ शकत नाही ती श्रद्धा असते. धर्माचा पाया हा या अशा सिद्ध न होऊ शकणाऱ्या श्रद्धेवरच आधारित आहे. त्यामुळे धर्म असायला हवा, पण तो केवळ वस्तुसंग्रहालयातच, असे परखड मत ज्येष्ठ गीतकार, पटकथालेखक आणि विचारवंत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आणि ‘जी ५ए’ च्या सभागृहात रंगलेली ‘लोकसत्ता गप्पां’ची मफल एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचली. अभिनेता आणि कवी किशोर कदम (सौमित्र) यांनी जावेद अख्तर यांना विविध प्रश्न विचारत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू उलगडले.

साहित्य, संगीत आणि कला या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या प्रथितयश व्यक्तींना अधिक जवळून समजून घेण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे पहिले पुष्प ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भरप्पा यांच्यासह, तर दुसरे पुष्प पं. सत्यशील देशपांडे यांच्यासह रंगले होते. शनिवारी वरळी येथील ‘जी ५ए’ या छोटेखानी पण देखण्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जावेद अख्तर यांच्यासह मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी निमंत्रित मान्यवरांना मिळाली. या कार्यक्रमासाठी ‘केसरी’ हे सहप्रायोजक, तर ‘झी २४ तास’ हे टेलिव्हिजन पार्टनर होते.

िहदी चित्रपटसृष्टीत ५० वर्षांपेक्षा जास्त काळ पटकथा-संवाद लेखक आणि गीतकार म्हणून देदीप्यमान कारकीर्द असलेले जावेद अख्तर एक प्रागतिक विचारवंत म्हणूनही ओळखले जातात. त्या अनुषंगाने किशोर कदम यांनी त्यांना ‘धर्म असावा का’ हा प्रश्न विचारला. ओठांच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये मिश्किल हसू आणत त्यांनी समोर बसलेल्या प्रेक्षकांकडे पाहत ‘धर्म जरूर असावा, पण तो वस्तुसंग्रहालयात’ हे उत्तर दिल्यावर उपस्थितांमध्ये हास्याचा एकच स्फोट झाला. वाईट गोष्टी चकचकीत शब्दांमध्ये मांडण्याचे काम आपण करत असतो. महिलांवरील अन्यायांना आपण ‘फॅमिली ऑनर’ म्हणतो, तेलासाठी दुसऱ्या देशात युद्ध करण्याला ‘वॉर ऑन टेरर’ म्हटले जाते. खासगीकरणाला होणारा विरोध मावळावा म्हणून त्याला उदारीकरण म्हटले जाते. तसेच अनेक असह्य़ गोष्टी लपवण्याचे काम धर्म खुबीने करतो असेही ते म्हणाले.

या प्रश्नांबरोबरच समान नागरी कायदा, पुतळे, चित्रपटांमधील आयटम साँग्ज अशा अनेक प्रश्नांवर अख्तर अगदी मनापासून व्यक्त झाले. सलीम-जावेद जोडी, ती जोडी फुटण्यामागील कारणे, खासदार असताना स्वामित्व हक्क कायद्यासाठी केलेली मेहनत, िहदी चित्रपटसृष्टीतील खलनायक, कारकीर्दीची सुरुवात, पटकथा-संवाद लिहिताना लेखकाची असलेली तरल अवस्था अशा अनेक गोष्टी त्यांनी दिलखुलासपणे श्रोत्यांसमोर खुलवल्या.

कधी आपल्या खुमासदार शैलीत प्रश्न विचारणाऱ्यांचीच फिरकी घेत, तर कधी अगदी गजल या काव्यप्रकाराचे व्याकरण समजावून सांगत जावेद अख्तर यांनी दोन तास ही गप्पांची मफल रोशन करून

‘लोकसत्ता गप्पा’ सहप्रायोजक ‘केसरी’ आणि टेलिव्हिजन पार्टनर ‘झी २४ तास’ या कार्यक्रमासाठी दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, सुनील बर्वे, हृषीकेश जोशी, प्रतीक्षा लोणकर, प्रेमानंद गज्वी, अतुल परचुरे, सोनिया परचुरे, गुरू ठाकूर, पटकथा लेखिका मनीषा कोरडे, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, प्रसाद कांबळी, अरुण शेवते, युवराज मोहिते, पुरुषोत्तम बेर्डे, विजय केंकरे, अजित भुरे, वैजयंती कुलकर्णी-आपटे, सनदी अधिकारी दीपक कपूर, मुंबईचे वाहतूक पोलीस सह-आयुक्त मििलद भारंबे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हरीश बजल, लेखक शरद वर्दे, प्रकाशक रामदास भटकळ, अरिवद पाटकर, मोनिका गजेंद्रगडकर, चित्रकार दत्तात्रय पाडेकर, ‘आयडीएफसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये, ‘झी’चे प्रोग्राम हेड निलेश मयेकर, ‘बिर्ला सनलाईफ’चे अमित मांजरेकर, डॉ. अनिल बांदिवडेकर, डॉ. राजेंद्र बर्वे, विश्वास सोहनी, नाटककार अरिवद औंधे, कवी महेश केळुस्कर, शर्वरी पाटणकर, डॉ. मनीषा टिकेकर, सचिन कुंडलकर, मंदार भारदे, नितीन वैद्य, समीक्षक लेखक गणेश मतकरी, प्रा. मीनाक्षी दादरावाला आदी मान्यवर उपस्थित होते.

सध्या समाजात असहिष्णुता वाढली आहे का, या प्रश्नाचे उत्तरही जावेद अख्तर यांनी खूप मार्मिक शब्दांत दिले. आत्ताच गोष्टी बिघडल्या आहेत, असे नाही आणि आत्ताच सर्व काही छान होत आहे असेही नाही. पण ‘जानें भी दो यारो’ चित्रपटातील ‘महाभारता’सारखा प्रसंग आजच्या जमान्यात दाखवण्याचे धाडस केले, तर जीवावर बेतेल. याआधीच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवली, तर ते चालण्यासारखे होते. पण या पंतप्रधानांच्या धोरणांना विरोध करणे म्हणजे देशद्रोह, ही मोजमापाची फुटपट्टी अत्यंत दुटप्पी असल्याची टीकाही त्यांनी केली.