‘धर्माचा पाया हा सिद्ध न होऊ शकणाऱ्या श्रद्धेवर आधारित आहे. त्यामुळे धर्म असायला हवा, पण तो केवळ वस्तुसंग्रहालयातच’, असे परखड विचार मांडणाऱ्या शब्दप्रभू जावेद अख्तर यांच्या मुक्त विचारांचे चिंतन ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगले होते. धर्मापासून ते समान नागरी कायदा, पुतळ्यांचे राजकारण, चित्रपटातील आयटम साँग्ज अशा वेगवेगळ्या विषयांवर जावेद अख्तर यांनी मारलेल्या गप्पा पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमांतर्गत जावेद अख्तर यांच्याबरोबर रंगलेले गप्पाष्टक ‘झी २४ तास’ वाहिनीवर रविवारी, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

चित्रपटसृष्टीत आपल्या पटकथेतून ‘शोले’मय इतिहास रचणारे, गीतकार म्हणून आपल्या शब्दांच्या जोरावर सगळ्यांना नाचवणारे ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर यांच्याबरोबर गप्पांचा कार्यक्रम ‘लोकसत्ता’ने ‘जी ५ ए’ या सभागृहात आयोजित केला होता. ‘केसरी’ सहप्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमासाठी ‘झी २४ तास’ वाहिनी टेलीव्हिजन पार्टनर होते. त्यामुळे कवी सौमित्र यांनी विविध प्रश्न विचारत रंगवलेला जावेद अख्तर यांच्याबरोबरच्या गप्पांचा कार्यक्रम रसिकांना पुन्हा पाहता येणार आहे.