देवळाली तोफखाना केंद्रातील लष्करी अधिकाऱ्याच्या घरी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या डी. एस. रॉय मॅथ्यूज या जवानाच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांकडून ‘द क्विंट’ संकेतस्थळासाठी काम करणाऱ्या पुनम अग्रवाल या महिला पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय गुप्ततेशी संबंधित असलेल्या गुन्हेगारी घुसखोरी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, लष्कराने यासंबंधी पोलिसांकडे अर्ज दिल्यानंतर केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये लष्कराने देवळाली तोफखाना केंद्रातील निषिद्ध परिसरात पत्रकाराने घुसखोरी केल्याची तक्रार केली होती. तसेच या पत्रकाराने लान्स नायक रॉय मॅथ्यू याला हेतूपूर्वक काही प्रश्न विचारल्याचे लष्कराने म्हटले आहे. हा अर्ज वाचल्यानंतर आम्ही अग्रवाल यांच्याविरोधात कलम ३ आणि कलम ७ अंतर्गत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अग्रवाल यांची चौकशीही केली होती. या चौकशीदरम्यान अग्रवाल यांनी स्टिंग ऑपरेशनसाठी कोणाकोणाची मदत झाली, देवळाली तोफखाना केंद्राच्या परिसरात कशाप्रकारे प्रवेश मिळाला आणि हा व्हिडिओ कुठे चित्रित करण्यात आला, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पोलिसांनी अग्रवाल यांच्याकडून स्टिंग ऑपरेशनचे मूळ फुटेजही हस्तगत केले आहे. दरम्यान, ‘द क्विंट’च्या संकेतस्थळावरून संबंधित स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ यापूर्वीच काढून टाकण्यात आला आहे.

पुनम अग्रवाल यांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या घरी कार्यरत सहाय्यकांना कशा पध्दतीने राबवून घेतले जाते, याबद्दल ‘स्टिंग ऑपरेशन’ केले होते. या स्टिंग ऑपरेशनने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांतच स्टिंग ऑपरेशनमध्ये बोलणाऱ्या डी. एस. रॉय मॅथ्यूजने आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा संदर्भ समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ झालेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’शी जोडला गेला. ते व्हायरल झाल्यानंतर गायब झालेल्या मॅथ्यूज यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. या स्टिंगमध्ये मॅथ्यूज यांनी जवानांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर टीका केली होती. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीला दिल्या जाणाऱ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना संबंधित कुटुंबियांच्या घरात मुलांची शाळेत ने-आण करणे, कुत्र्याला फिरवून आणणे, अधिकाऱ्यांच्या पत्नीला ‘ब्युटी पार्लर’मध्ये घेऊन जाणे, कपडे धुणे तत्सम कामे करावी लागत असल्याचे चित्रफितीतून समोर आले होते.