आठवडा उलटल्यानंतरही जवखेडा गावातील दलित कुटुंबातील तिघांच्या क्रूर हत्याप्रकरणातील आरोपींना अटक केली जात नसल्याबद्दल आंबेडकरी तरुणांमध्ये जातीय अत्याचाराच्या आणि सत्तेसाठी उंबरठे झिजवणाऱ्या दलित नेतृत्वाच्या विरोधातही तीव्र असंतोष उफाळू लागला आहे. एकेकाळी जातीयवादाच्या विरोधात लढणाऱ्या दलित पॅंथर या संघटनेचे नेते अविनाश महातेकर यांना या आंदोलनाला राजकीय वास येत असल्याचे वाटते. तर, जवखेडा हत्याकांड जातीयवादातूनच घडले आहे, असे प्रसिद्ध साहित्यिक व पुरोगामी चळवळीचे खंद्दे समर्थक रंगनाथ पाठारे यांचे ठाम मत आहे.
दलित अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीत पाठारे यांचा समावेश होता. या घटनेनंतर त्यांनी जवखेडाला जाऊन घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षांतील दलितांवरील अमानुष अत्याचाराची ही तिसरी घटना आहे. दिवळीचा सण सर्वत्र साजरा केला जात असतानाच जवखेडा गावात दलित कुटुंबातील संजय जाधव, जयश्री जाधव या पती-पत्नी व त्यांचा मुलगा सुनील याची निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे आदी नेत्यांनी जवखेडाला जाऊन या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काही ठिकाणी आंदोलनेही झाली. एका बाजूला दलितांवर जातीय अत्याचार होत असताना काही नेते सत्तेच्या सौदेबाजीत गुंग असल्याच्या प्रतिक्रिया आंबेडकरी तरुणांमधून उमटत आहेत. हा राग डोक्यात घेऊन राज्यभरात स्थानिक पातळीवरचे रिपब्लिकन, दलित संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू लागले आहेत. शुक्रवारी भाजप मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली, हे लोण आता राज्यभर पसरु लागले आहे.

मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याच्या वेळी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर व अन्य संघटनांनी केलेल्या आंदोलनास राजकीय वास आहे. सत्तेच्या सौदाबाजीत मश्गुल झालेल्या नेत्यांच्या विरोधात हा उद्रेक आहे असे वाटत नाही, पण जेव्हा-जेव्हा काँग्रेस सत्तेवरून दूर जाते, त्या-त्या वेळेस अशा घटनांचे भांडवल करुन दलित तरुणांना चिथावले जाते, नवनियुक्त भाजप सरकारच्या विरोधात दलित तरुणांना भडकावण्याचा हा काँग्रेसचा डाव आहे.’
 –  अविनाश महातेकर  

जवखेडा गावातील तिहेरी दलित हत्याकांड हे जातीय मानसिकतेतून झाले आहे आणि त्याविरोधात दलित तरुणांमधील उद्रेक बाहेर येत आहे. प्रेमकरण वगैरे कारणे पुढे केली जात असली तरी आमचे कुणी काही करु शकत नाही, ही उच्चनीचतेची भावना त्या मागे आहे. तीन दलितांची ज्या क्ररतेने व अमानुषपणे हत्या केली, त्यावरुन हा जातीय अत्याचारच प्रकार आहे हे स्पष्ट होते. दलित तरुणांमध्ये जातीय अत्याचाराच्या विरोधात असंतोष आहे, तो रस्त्यावर येत आहे, परंतु अशा मानसिकतेविरुद्ध  सर्वच समाजातील संवेदनशील लोकांनी पुढे आले पाहिजे.
– रंगनाथ पाठारे