News Flash

पैसे वाचविण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ

राज्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलने सुरू आहेत.

जयंत पाटील

जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना, केवळ तिजोरीतील पैसे वाचविण्यासाठी राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ३१ ऑक्टोबरनंतर राज्यात दुष्काळ जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठीही मुहूर्त शोधत आहे काय, असा सवाल पाटील यांनी केला.

राज्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांत आंदोलने सुरू आहेत. त्याची साधी दखलही घ्यायला सरकार तयार नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला ३१ ऑक्टोबरला ४ वर्षे पूर्ण होत आहे. हा मुहूर्त साधून तर राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत नाही ना, अशी विचारणा त्यांनी केली.

लोकांना पिण्याचे पाणी कुठून पुरवायचे, हा मोठा प्रश्न सरकारसमोर आहे. सरकारचे हे अपयश आहे. मागच्या आठवडय़ातच सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा होता; परंतु भाजप सरकार राज्यातील जनतेला वेठीस धरत आहे. भाजप सरकारला जनतेची नव्हे, तर फक्त निवडणुका जिंकण्याची चिंता आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘सर्वच योजना अपयशी’

राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीला सरकारच जबाबदार असून सरकारच्या पाणी वाचवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण या सर्वच योजना अपयशी ठरल्या आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 4:19 am

Web Title: jayant patil attack on maharashtra government over drought issue
Next Stories
1 पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
2 राज्यात ४२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
3 व्यापाऱ्यांनीच भाजपला सत्तेत बसवले
Just Now!
X