22 July 2019

News Flash

पैशांच्या मदतीने काही होणार नाही; कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्या-जयंत पाटील

'स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदा कळलं'

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाली पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली आहे. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यु झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी भेट दिली. तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं होते त्यानंतरही घटना घडली. याचा अर्थ स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदा कळलं आहे. ऑडिट करताना वरवर काम केलं गेलं त्यामुळे ही घटना घडली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

जी टी हॉस्पीटलच्या महिला कर्मचाऱ्यांचा या घटनेत मृत्यु झाला आहे. ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळी पालिका आणि रेल्वे विभागाने टोलवाटोलवी केली. लोकांचे प्रश्न सोडवा टोलवाटोलवी करू नका, भुयारी मार्ग निर्माण करा ज्यामुळे पुन्हा अशा घटना घडणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेत युतीचे सरकार आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला याचा जाब विचारला पाहिजे. तकलादूपणा बंद करा. ऑडिट फेल झालं ही बाब गंभीर आहे. सरकारचे कामाकडे लक्ष नाही असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती असा टोला लगावतानाच मुंबईचे वाटोळे शिवसेनेने केले अशी जोरदार टिकाही जयंत पाटील यांनी केली.

First Published on March 15, 2019 3:16 pm

Web Title: jayant patil demands to give job to csmt bridge collapse victim family