जयेश शिरसाट

खाडा.. संघटित टोळ्यांच्या जन्माआधी स्वत:च्या हिमतीवर दादागिरी करणाऱ्यांच्या मुंबईतलं प्रमुख केंद्र. संघटित टोळ्यांमधलं खरा संघर्ष १९८१मध्ये दाऊदचा भाऊ शाबीरच्या हत्येनंतर पेटला. ‘गँगवॉर’ ही संकल्पना त्यानंतरच रूढ झाली. बहुतांश गुंडांच्या कपाळी या ना त्या टोळी किंवा कंपनीचा शिक्का पडला. ही साथ खाडय़ात कधीच पसरली नाही. इथे दादा होते, सरावलेले गुंड होते. वार, कापाकापी इथेही सुरू होती. पण इथली हातघाई वस्ती विरुद्ध वस्ती अशी होती. आज ते दादा नाहीत, वस्तीही बदलली पण खाडा या नावातली दहशत मात्र कायम आहे.

loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
traffic congestion will affect industries in metros in future says union minister rajeev chandrasekhar
पुण्यासह इतर महानगरांसाठी धोक्याची घंटा! केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांचा इशारा
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली

७०च्या दशकात पोटापाण्यासाठी राज्यातून कुशल-अकुशल कामगारांचे जथे मुंबईत धडकू लागले. जागा मिळेल तिथे वसले आणि शहराच्या कानाकोपऱ्याला नवी ओळख मिळू लागली. प्रभादेवीतला खाडाही असाच वसलेला. समुद्राला मिळणारा नाला बुजवून झोपडय़ा उभ्या राहिल्या. आसपास कवळी वाडी, पिठाची चाळ, नागू सयाजी वाडी, भटाची चाळ, शर्मा चाळ अशी वस्ती आजूबाजूला उभी राहिली. खाडय़ात आगरी समाज प्रामुख्याने होता. मोजक्या खोल्यांमध्ये विडय़ा वळणारे तेलगू राहत होते. हातावर पोट असलेल्या वस्तीतले बहुतांश पुरुष गिरण्यांमध्ये, आसपासच्या औद्योगिक वसाहतींमध्ये घाम गाळत. दोन एकमजली चाळी सोडल्या तर उर्वरित वस्ती बैठीच होती. दोन नंबर चाळीमागील आवारात गिरजा घाडगे, महादेव ऊर्फ कुडा मोकल यांच्या २४ तास धगधगत्या गावठी दारूच्या भट्टय़ा होत्या. खाडय़ात भाजीचे मोठे मळेही होते. मालकाच्या पश्चात मळ्याच्या जागेत वस्ती उभी राहिली. गेल्या काही वर्षांमध्ये इथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून बहुमजली इमारती उभ्या राहिल्या. त्याच जागेत विकासकांनी खासगी टोलेजंग टॉवर उभारले. खासगी बँका, कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालयं, महागडय़ा गाडय़ांची शोरूम अशा चकचकीत आस्थापनांमुळे खाडय़ाचं रंगरूप पालटलंय.

खाडा म्हटलं की म्हात्रे, तांडेल, कोठेकर, भाटकर ही नावं आणि त्यांच्या दादागिरीची चर्चा होते. यातली काही नावं प्रत्यक्ष खाडय़ातली तर काही आसपासच्या वस्त्यांमधली. खाडय़ात सुरुवातीपासून म्हात्रे कंपनीचा दबदबा होता. शेजारील शर्मा किंवा चारमजली चाळीचं आणि खाडय़ाचं वाकडं. कशावरून? तर ताकदवान कोण यावरून. दर रविवारी या दोन वस्त्यांमधला राडा ठरलेला. रविवार उगवला, गावठी दारूवर म्हावऱ्या तुकडय़ा खाली उतरल्या की हमरीतुमरीला सुरवात. मग सोडा बाटल्या, टयूब लाइट, लाकडी बांबू, शिगा घेऊन एकमेकांवर तुटून पडायचं. ठरल्याप्रमाणे दर रविवारी हा सामना रंगे. शर्मा चाळ खाडय़ात घुसायचा प्रयत्न करे. खाडा त्यांना पळवून लावे. सोमवार उजाडला की शनिवार संध्याकाळपर्यंत दुश्मनीला विश्रांती. हा जणू दुश्मनीतला अलिखित नियमच होता. मैत्रीसाठी खाडय़ाने भटाची चाळ, नागू सयाजी वाडी, पिठाची चाळ, आदर्श नगर, शापूरजी पालनची झोपडपट्टी या वस्त्यांशी वैर घेतलं. ते कायमचंच.

अरुण गवळीचा विश्वासू हस्तक विजय तांडेल गँगस्टर बनला तो खाडय़ामुळे. विजयचे वडील सदानंद यांचाही दबदबा होता. खाडय़ाजवळील वस्तीत त्यांचीही दादागिरी चाले. काही कारणावरून विजयला खाडय़ातल्या मुलांनी मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी सदानंद तलवार घेऊन खाडय़ावर आले. त्यावेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला घडला. त्यातून ते बचावले. मात्र त्यांनी हाय खाल्ली. त्याचा बदला घेण्यासाठी विजयने सुधीर भाटकरची हत्या केली. सुधीर हा सुहास ऊर्फ पोत्याचा सख्खा भाऊ. त्यानंतर उद्भवलेल्या संघर्षांतून विजयने दगडी चाळीचा आश्रय घेतला आणि टोळीतला प्रमुख गँगस्टर म्हणून पुढे आला.

शिवसेनेसोबत खाडय़ाचं कायम वाकडं होतं. दत्ताजी साळवी यांचा पुतण्या सुनील याची वैयक्तिक वादातून खाडय़ातल्या मुलांनी हत्या केली. त्याचा बदला घेण्यासाठी शिवसैनिक खाडय़ात घुसले. त्या वेळी मारहाणीत एका तरुणीचा मृत्यू ओढवला. तेव्हापासून खाडा आणि शिवसेना यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. आजही खाडय़ातील जुनी मंडळी शिवसेनेची कट्टर विरोधक आहेत.

कवळीवाडीतल्या पोत्याची टोळी होती. खाडा आणि कवळी चाळ सोबत होते. वाद घेऊन कोणी आलं की पोत्या आणि त्याची टोळी त्याची दुश्मनी आपल्या अंगावर घेत होती. त्यातून शहरातच्या कानाकोपऱ्यात असंख्य मारामाऱ्या, हत्या घडल्या. टोळीचा खर्च भागवण्यासाठी पोत्या कंपनी शहरातले मटक्याचे अड्डे लुटू लागली. या लुटमारीमुळे मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूपर्यंत पोत्याची दहशत वाढली. एका चकमकीत पोत्या ठार झाल्यानंतरही काही र्वष त्याची टोळी जिवंत होती.

संघटित टोळीने गोळीबार केल्याची एकच घटना खाडय़ाच्या स्मृतींत ताजी आहे. खाडय़ात शेखर पावसकर आणि शाम दळवी हे दोन गुंड नव्याने उदयाला येत होते. यातल्या शेखरला अमर नाईक टोळीच्या गुंडांनी खाडय़ातच गोळ्या घातल्या. पुढे शेखरची टिप दिली या संशयावरून दळवीचीही हत्या करण्यात आली.

शहरात सर्वत्र गँगवॉरला तोंड फुटलं. गुंडांच्या हातात चाकू-सुऱ्यांऐवजी बंदुका आल्या. एके-४७ सारखी अद्ययावत शस्त्र आली. पण खाडय़ात त्या काळातही अठरा (अठरा इंची चाकू), गुप्ती, चॉपर, तलवारीच्या जोरावरच दादागिरी सुरू होती. शत्रूला ललकारून, त्याच्या घरात घुसून स्वबळावर मारणं हीच पद्धत इथे शेवटपर्यंत कायम होती. जुन्या खोडांना चाळवलं की इथे घडलेल्या हत्यांचे किस्से, रविवारचा वस्ती विरोधात वस्ती संघर्षांचं वर्णन आजही ऐकायला मिळतं. ही दादागिरी सुरू असतानाच खाडय़ातला गोविंदा आणि होळी हे दोन सण जोरात होत. कृष्ण जन्माष्टमीच्या आयोजनामुळे खाडय़ातून निघणारी मिरवणूक पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. त्या काळात एका ट्रकवर कृष्ण-राधेच्या प्रतिकृती आणि मागील ट्रकवर पेंद्यापासून गोकुळातील पात्रांचा देखावा, सजावट वेगळीच. होळीही मोठी, पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी.

खाडा गाजवणारे त्या काळातले बहुतांश दादा, गुंडांची हत्या घडली, काही पोलिसांच्या चकमकीत ठार झाले, त्यातून वाचलेले काही आजारपणाने गेले. मोजकी जुनी खोडं उरलीत. जी आज इतस्त: स्थायिक आहेत. काळाची गरज ओळखून त्यांनी दादागिरी सोडली. खटल्यांमधून निर्दोष मुक्त होत सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहेत. त्यांची पुढली पिढी सुशिक्षित आहे, स्वत:च्या पायावर उभी आहे. खाडय़ातला तो काळ आठवला की अंगावर काटा येतो. त्या वयात जे घडलं त्याचं आज आश्चर्य वाटतं, ही त्यांची प्रतिक्रिया.

jayesh.shirsat@expressindia.com