जयेश शिरसाट

हत्येसारखा गंभीर गुन्हा, तो दडवण्यासाठीचा आटापिटा, कपोलकल्पित नावं किंवा कथानकं उभी करून पोलिसांची दिशाभूल हे प्रकार पोलिसांना नवे नाहीत. पण जेव्हा हे प्रयत्न गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या नवख्यांकडून होतात तेव्हा पोलीसही बुचकळय़ात पडतात. त्यातही गुन्हा गंभीर असेल आणि माध्यमांच्या आकर्षणाचं केंद्र असेल तर त्याचा तत्परतेनं छडा लावणं, हे प्रचंड आव्हानात्मक असतं. सिद्धार्थ संघवी हत्याप्रकरण यामुळेच पोलिसांसाठी आव्हान होतं.

हुशारी, मेहनतीच्या जोरावर खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बॅंकेत उपाध्यक्षपदी पोहोचलेले सिद्धार्थ ५ सप्टेंबरच्या संध्याकाळी बेपत्ता झाले. कार्यालयातून सुटले की थेट घर गाठणं हा त्यांचा शिरस्ता. उशीर होणार असेल तर न चुकता कळवणं ही त्यांची शिस्त. त्यामुळे रात्री दहा वाजले तरी सिद्धार्थ घरी न पोहोचल्याने संघवी कुटुंबीय काळजीत होते. सिद्धार्थ त्यांचा फोन बंद ठेवणं कुटुंबीयांच्या काळजीत आणखी भर पाडत होतं. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सिद्धार्थ कार्यालयाबाहेर पडले होते. ते पुढे कुठे गेले याबाबतची माहिती सहकारी, जवळचा मित्रपरिवार, नातेवाईक यापैकी कुणाकडेच नव्हती. मध्यरात्री संघवी कुटुंबाने ना. म. जोशी पोलीस ठाणं गाठून तक्रार दिली.

पोलीस तपास सुरू झाला. ५ सप्टेंबरला सिद्धार्थ यांचं शेवटचं लोकेशन कमला मिल संकुल होतं. याच संकुलात त्यांचं कार्यालय आहे. त्यानंतर त्यांचा मोबाइल फोन बंद झाला किंवा करण्यात आला. रात्र असल्याने संकुलातून बाहेर पडणारी वाहनं सीसीटीव्ही चित्रणात अस्पष्ट दिसत होती. सिद्धार्थ यांच्याकडे निळ्या रंगाची मारुती एग्नीस कार होती. त्या दिवशी रात्री आठच्या सुमारास संकुलातून तीन ते चार निळ्या रंगाच्या कार बाहेर पडल्या. मात्र त्यापैकी एक कार सिद्धार्थ यांचीच होती हे अंधूक चित्रणामुळे पोलिसांना स्पष्ट होत नव्हतं. संकुलातील बहुमजली वाहनतळाच्या तिसऱ्या मजल्यावर सिद्धार्थ कार पार्क करत. ते ठिकाण गाठल्यावर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिथे रक्ताचे डाग आढळले होते. पुढे संध्याकाळी पाचच्या सुमारास काही सेकंदांसाठी सिद्धार्थ यांचा मोबाइल फोन सुरू झाला. लोकेशन कोपरखरणे होतं. पोलीस पथक त्या ठिकाणी धडकलं तेव्हा सिद्धार्थ यांची कार रस्त्याकडेला बेवारस अवस्थेत सापडली. कारच्या मागील आसनावरही रक्ताचे डाग आढळले आणि प्रकरणाचं गांभीर्य वाढलं. वाहनतळासोबत कारमध्येही रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांचं विचारचक्र वेगाने फिरू लागलं. अपहरण आणि हत्या? पण कोणाची? सिद्धार्थ यांची की सिद्धार्थनी आणखी कुणाची केली?

याच दरम्यान ८ सप्टेंबरला सिद्धार्थ यांच्या मोबाइलवरून एक फोन त्यांच्या नातेवाइकाला करण्यात आला. सिद्धार्थ सुखरूप आहे, तुम्ही इथे तिथे चौकशी करू नका, माझ्या पुढल्या फोनची वाट पाहा.. इतका निरोप देऊन समोरून बोलणाऱ्याने फोन ठेवून दिला. या घडामोडीमुळे अपहरण हा पोलिसांचा अंदाज खरा ठरू पाहात होता. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र शिसवे यांनी ना. म. जोशी मार्ग पोलिसांसोबत साहाय्यक आयुक्त शशांक सांडभोर, वरिष्ठ निरीक्षक दिनेश कदम आणि सुखलाल वर्पे अशा अनुभवी अधिकाऱ्यांना तपासात उतरवलं. ९ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा समांतर तपास करणाऱ्या नवी मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या जोरावर सरफराज शेख या २५ वर्षांच्या मजुराला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सिद्धार्थ यांचा मोबाइल आणि सीमकार्ड सापडलं. दोनच दिवसात बहुचर्चित प्रकरण बनल्याने नवी मुंबई पोलिसांनी आधी सरफराजकडे चौकशी केली. पण चौकशीत सरफराजने मिनिटा मिनिटाला दावे बदलल्याने, गोल गोल उत्तरं देऊन संभ्रमित केल्याने त्यांनी सरफराजबाबत मुंबई पोलिसांना कळवलं.

चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातून पोटापाण्यासाठी मुंबईत आलेल्या सरफराजला गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. ही हत्या मी केलेली नाही. पण मृतदेह मी दडवला, हे सरफराजचं पहिलं वाक्य. ही हत्या सिद्धार्थ यांच्याच ओळखीतल्या व्यक्तींनी केलीये. त्यात एक महिलाही आहे. मारेकरी बहुधा त्यांचे सहकारी असावेत. अशी विसंगत माहिती देताना एका टप्प्यावर ही हत्या मीच केली, असंही सरफराजने मुंबई पोलिसांच्या चौकशीत सांगितलं. पैशांसाठी हत्या केल्याचा त्याचा दावा होता. पण सरफराजची अंगकाठी, देहबोली आणि पार्श्वभूमी पाहता हा गुन्हा त्याने एकटय़ाने केला? हा प्रश्न पोलिसांना पडला. म्हणजे हत्येपासून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंत सर्वच एकटय़ाने, कसं शक्य आहे? अशी चर्चा तपास करणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला होती. प्रत्यक्षदर्शीसह कोणताही ठोस पुरावा नसताना सरफराजच्या बदलत्या दाव्यांच्याआधारे तपास भरकटण्याची शक्यता जास्त होती.

अखेर पोलिसांचा अनुभव आणि चातुर्य कामी आले. जी नावं तो घेत होता त्या व्यक्तींबाबतची कोणतीही माहिती सरफराज देऊ शकला नाही. मुळात तशा नावांच्या व्यक्ती अस्तित्वात नव्हत्याच. तो स्वत:ला वाचण्यासाठी खोटी, बनावट पात्रं उभी करतोय हे पोलिसांना क्षणात समजलं. तरीही पहिल्यांदाच चाकू हाती घेणाऱ्या सरफराजने एकटय़ाने इतका मोठा गुन्हा केला हे पोलिसांना पटत नव्हतं. तीन ते चार अनुभवी अधिकाऱ्यांनी सरफराजची स्वतंत्रपणे चौकशी केली. त्याने दिलेल्या प्रत्येक माहितीची शहानिशा करण्यात आली. अखेर आरोपी एकच, सरफराज असा निष्कर्ष चौकशी करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने दिला.

मुंबईत आल्यानंतर कमला मिल संकुलात सरफराज मजुरी करे. कामाच्या निमित्ताने दोन वर्षांहून अधिक काळ त्याचा वावर संकुलात होता. यातील काही महिने तो संकुलातच राहात होता. अलीकडच्या काळात तो अ‍ॅप आधारित टॅक्सी चालक म्हणून काम करत होता. या दरम्यान त्याने कर्ज काढून मोटरसायकल विकत घेतली होती. मात्र चालकाची नोकरी सुटली आणि कर्जाचे हप्तेउराशी आले. हाताला काम मिळत नसल्याने तो कामाच्या आशेने कमला मिल संकुलात येत होता. पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरात निराशा पडत होती. अशा परिस्थितीत त्याच्या मनात संकुलातील अंधाऱ्या वाहनतळावर लूटमार करण्याचा विचार घोळू लागला. वाहनतळावर सीसीटीव्ही नाहीत. ठरावीक वेळेनंतर सुरक्षारक्षक नसतात याची पूर्ण कल्पना सरफराजला होती. ५ सप्टेंबरच्या आधीपासून त्याने वाहनतळावर दबा धरण्यास सुरुवात केली होती. रात्री आठनंतर निर्जन, अंधाऱ्या वाहनतळावर कार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला चाकूच्या धाकात लुटून पसार व्हायचं हा त्याचा बेत. पण हिंमत होत नव्हती. एकदा त्याने हिंमत केली पण एकटय़ा व्यक्तीच्या मागून आणखी दोन व्यक्ती वाहनतळावर आल्या. बेत फसला. ५ सप्टेंबरलाही सरफराज आधीपासूनच वाहनतळावर होता. पावणे आठच्या सुमारास सिद्धार्थ वाहनतळावर आले. ‘सावज सापळय़ात अडकलं’ असा विचार करून सरफराज पुढे सरसावला आणि सिद्धार्थ यांच्या मागून त्यांच्या कारमध्ये शिरला. चाकू दाखवून धमकावले, पैशांची मागणी केली. घाबरलेले सिद्धार्थ मदतीसाठी ओरडले. त्यामुळे सरफराजही घाबरला. सिद्धार्थ काही केल्या प्रतिकार थांबवत नाहीत, गप्प बसत नाहीत हे लक्षात येताच सरफराजने त्यांच्यावर चाकूचे वार केले आणि त्यांची हत्या केली. चार तास त्यांच्या मृतदेहाशेजारी बसला. रात्री अकरा-बारा वाजण्याच्या दरम्यान मृतदेह कारमध्ये ठेवून त्याने कल्याण गाठलं. तिथे मृतदेह दडवून घरी परतला. पुढले दोन दिवस

त्याने आपला दिनक्रम तसाच सुरू ठेवला होता. रात्री वाहतूक कोंडी नसते, अंधारात सीसीटीव्हीत स्पष्ट चित्रण कैद होत नाही या विचाराने त्याने संकुलातून बाहेर पडण्यासाठी ती वेळ निवडली. त्याने सांगितलेल्या ठिकाणावरून सिद्धार्थ यांचा मृतदेह हस्तगत करण्यात आला.