मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा साखळीतील (जेईई) मुख्य परीक्षेच्या चौथ्या सत्राचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला. या परीक्षेत १०० पर्सेंटाईल ४४ विद्यार्थी असून त्यात राज्यातील पाच विद्यार्थी आहेत. मुंबईतील अथर्व तांबट, सौरभ कुलकर्णी आणि अमेय देशमुख, स्नेहदीप गायेन, गार्गी बक्षी यांनी बाजी मारली आहे.

जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी कट ऑफमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. राष्ट्रीय चाचणी कक्षाने (एनटीए) जाहीर केलेल्या सूचनेनुसार १८ उमेदवारांनी चौथ्या सत्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यात राज्यातील ५ विद्यार्थ्यांचा तर आंध्र प्रदेशातील ४, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी २ उमेदवार आहेत. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत झालेली ही परीक्षा ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी दिली. चारही सत्रे मिळून यंदा देशभरातून तब्बल नऊ लाख ३९ हजार ८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

जेईई मुख्य परीक्षेचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर अनेक सरकारी अनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी करण्यात येते. मुख्य परीक्षेच्या चारही सत्रांमध्ये मिळून २.५ लाख विद्यार्थी गुणवत्तेनुसार जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरणार आहेत.

अ‍ॅडव्हान्सची नोंदणी सुरू

आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार असून त्याचा निकाल १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. यासाठी मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना २० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.