‘आयआयटी’सह विविध राष्ट्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेतील यशवंतांनी ‘आयआयटी बॉम्बे’मध्ये प्रवेश घेण्यास पसंती दिली आहे. जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये देशात पहिल्या शंभरात स्थान मिळवणाऱ्या ६१ विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बे येथे, तर ३० विद्यार्थ्यांनी आयआयटी दिल्ली येथे प्रवेश घेतला आहे.

देशातील सर्व आयआयटीच्या प्रवेश नियमन प्राधिकरणाने (जेओएसएस) पहिली प्रवेश यादी नुकतीच जाहीर केली. पहिल्या हजार विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांचा कल यंदाही आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेण्याकडे असल्याचे दिसत आहे. बॉम्बे, दिल्लीनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटी मद्रास येथे प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले आहे. त्यातही संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसत आहे. ‘आयआयटी बॉम्बे’ची प्रवेश क्षमता यंदा साधारण ३ हजारांनी वाढली असून १६ हजार ५३ जागा उपलब्ध आहेत. त्यातील १५६ जागा मुलींसाठी राखीव आहेत. यंदा आयआयटीची प्रवेश प्रक्रिया सात टप्प्यांत होणार असून पात्रता गुणही (कट ऑफ) काहीसे कमी झाले आहेत.