दिवंगत चित्रकार एस. एम. पंडित यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘लोकरंग’नं छापलेले दोन लेख बऱ्याच जणांनी वाचले असतील. त्यातल्या मजकुराचा पडताळा घेण्याची संधी येत्या १३ जूनपर्यंत मिळणार आहे. कुठे? अर्थातच जहांगीर आर्ट गॅलरीत! (हीच मुंबईच्या काळा घोडा भागातली मोठी खूण असल्यानं खाणाखुणा सांगत गॅलरीचा पत्ता सांगण्याची ‘छाया डोळस’ पद्धत आज रद्द.) ‘जहांगीर’मधली एकमेकांना जोडलेली तीन प्रदर्शन दालनं पंडितांच्या चित्रांनी भरली आहेत. या चित्रांमध्ये वैविध्य पुष्कळ आहे. विषयाचं आणि रंगसाधनांचंही वैविध्य. कॅनव्हासवर तैलरंग, कॅनव्हासवरच टेम्परा, कागदावर पारदर्शक किंवा अपारदर्शक (पोस्टर कलरसारखे) जलरंग, लहान कागदांवर पेन्सिलनं, शाईनं किंवा खडूनं काढलेली रेखाचित्रं किंवा सरावचित्रं, छापील कॅलेंडरं असं साधनांचं वैविध्य आहे; तर चित्रांच्या विषयांमध्ये व्यक्तिचित्रं (पोट्र्रेट), पौराणिक किंवा एकंदर धार्मिक कथांवर आधारलेली कल्पनाचित्रं (याला पंडितच इंग्रजीत ‘व्हिजनरी पेंटिंग’ म्हणायचे), गणपती, काली यांसारख्या देवादिकांची चित्रं आणि १९४५ ते ६५ या काळातल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते/ अभिनेत्रींच्या भूमिका-रूपांची प्रामुख्यानं ‘फिल्मिंडिया’ मासिकाच्या मुखपृष्ठासाठी केलेली चित्रं एवढं वैविध्य या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळेल. एकंदर सुमारे दीडशेहून अधिक वेळा तुम्हाला कशा ना कशाकडे तरी पाहावं लागेल, इतकं हे प्रदर्शन भरगच्च आहे.

या प्रदर्शनाचं महत्त्वाचं वैशिष्टय़ असं की, इथे पंडितांच्या अनेक चित्रांच्या अनुषंगानं, त्याआधी त्यांनी केलेली सरावचित्रं किंवा रियाजचित्रं पाहायला मिळतात. पहिल्या-दुसऱ्या दालनाच्या पार्टिशनवर जी चित्रं लावली आहेत, त्यांत कुठे तरी तीन विवेकानंद आहेत. तिघेही उजव्या हातात दंडधारी. चेहरा काहीसा गोलाकार. पण मग ही तिन्ही चित्रं रद्दबातल करून, विवेकानंदांचं एक निराळंच- हाताची घडी घातलेलं चित्र पंडितांनी साकारलं (ते इथं नाही) ज्यावरून शिल्पकार नारायण सोनावडेकरांनी कन्याकुमारीचा पुतळा केला आणि मग तसेच विवेकानंद पुतळे सर्वत्र दिसू लागले. असो. आधी भरभर रेखाचित्रं काढून त्यातली एक रचना (कॉम्पोझिशन) निवडायची, मग चौरस-चौकटी (ग्राफ) काढलेल्या लहान कागदावर तीच रचना अधिक सुस्पष्टपणे रेखाटायची आणि पुढे ती कॅनव्हासवर उतरवायची अशी पद्धत या प्रदर्शनाच्या मांडणीमधून किंवा मांडणीमुळे उलगडते. प्रदर्शनाची एकूणएक मांडणी केवळ दृश्याधारित आहे. मध्यभागी ‘हे पंडितांचं जन्मशताब्दी प्रदर्शन आहे.. यांनी भरवलंय’ असा एक फ्लेक्सचा बॅनर सोडला, तर वाचण्यासाठी इथे काहीही नाही. सामान्यजनांसाठी आर्ट गॅलरी हा प्रकारच मुळात पाश्चात्त्य; आपले भारतीय सामान्यजन मंदिरांत किंवा गुंफांत जायचे तेव्हा आपसूक कला पाहायचेच.. त्यामुळे तिथे मंदिरांत जसं चित्राबद्दल काहीही लिहिलेलं नसताना सर्वजणांनी कलादर्शनाचा लाभ घ्यायचा असतो, तशीच पद्धत इथे पाळलेली असावी. पण या भारतीय पद्धतीमुळे गैरसोय होते, ती पंडितांनी केलेली पोट्र्रेट पाहताना. या व्यक्तिचित्रातील व्यक्ती कोण, हे समजायला काहीच हरकत नव्हती. शिवाय, ज्या चित्रांखाली स्वत: पंडित यांनीच स्वाक्षरीसोबत चित्र कोणत्या साली काढलं याचा उल्लेख केला आहे, तिथं तो वाचता येतो. पण एरवी पंडितांनी कधी काय केलं असेल, हे अंदाजानंच पाहावं लागतं.

अशा या अंदाजांच्या दृश्य-खेळातून विविध निष्कर्ष निघतील. पंडित यांच्या सर्व मोठय़ा चित्रांमधून दिसणारा प्रकाश हा अतिशय नाटय़मय, काहीसा अद्भुत वाटणारा (फँटसी लायटिंगसारखा) असतो हे तर कळेलच. पण पुढे ज्यांची कॅलेंडरं झाली किंवा जी चित्रं मुळात कॅलेंडरसाठीच काढली गेली, त्या चित्रांमधल्या मानवाकृतींवरला प्रकाश काहीसा उजळ, तर नंतरच्या काळातल्या काही चित्रांमध्ये प्रत्येक प्रमुख मानवाकृतीवरच्या प्रकाशात अगदी पोट्र्रेटमध्ये असते तितकी बारीक हाताळणी, असंही दिसेल. भरपूर रंगछटा, हे पंडित यांच्या अशा साऱ्या चित्रांचं वैशिष्टय़ आहेच. परंतु जी चित्रं त्यांनी ‘डेमोन्स्ट्रेशन’साठी म्हणजे व्यक्तिचित्रणाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी म्हणून केली, त्यांमध्ये अगदी मोजकेच रंग आहेत. त्या सर्व व्यक्ती भरपूर प्रकाशात होत्या किंवा पंडित यांना त्या व्यक्ती उजळ प्रकाशातच दाखवायच्या होत्या आणि कमी रंगांत प्रभाव साधायचा होता, असंही दिसून येईल.

पंडित यांच्या चित्रांची कॅलेंडरं झाल्यामुळे काय होई, याचं आज काहीसं रसभंगकारक किंवा विनोदी वाटणारं रूपसुद्धा -अगदी दोन छापील चित्रांतून का होईना, पण-  इथं दिसून येतं. यापैकी एका चित्रात शंकर-पार्वती आहेत. शंकर करारी, तर पार्वतीमाता तरुण- मीलनातुर गिरिजेच्या रूपात.. आणि याच चित्रातल्या शंकराच्या शेजारच्या दगडावर एक कंदील आहे! तो कोणत्या कंपनीचा, हेही चित्रावरच लिहिलंय. किंवा ‘शकुंतलेचे पत्रलेखन’ हे पंडितांच्या अत्यंत गाजलेल्या चित्रांपैकी एक, त्याचं ‘पारले’तर्फे कॅलेंडर झाल्यामुळे या चित्राखालचा तेवढय़ाच मापाचा भाग त्या कंपनीच्या विविध खाद्यवस्तूंच्या रंगीत चित्रांनी भरून गेलेला दिसतो आहे. ही चित्रं लावल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन. महाराष्ट्रातल्या घरोघरी त्या वेळी -म्हणजे १९५० आणि ६०च्या दशकांत- घेतला जाणारा चित्रानुभव कसा असेल, याची उत्तम कल्पना हीच चित्रं देतात. पुढे पंडित यांनी जी मोठमोठय़ा उद्योजकांची वगैरे व्यक्तिचित्रं केली आहेत, ती सारी १९७०च्या दशकापासूनची आहेत.

चित्रप्रदर्शनाचा अनुभव केवळ दृश्यातून घेत, आपापले निष्कर्ष काढत पाहण्याचं हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनासोबत तीन हजार रुपये किमतीचं २००७ सालच्या प्रदर्शनाच्या वेळी (तेव्हाच्या महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या संदेशासह) प्रकाशित झालेलं एक पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे; पण त्यातही वाचण्याची पानं कमी आहेत. कॅनव्हासवरलं एखाद्या तरुणीचं चित्र हलक्या रंगछटांचं दिसतं, तेव्हा ‘हेही व्यक्तिचित्रण- प्रात्यक्षिकातलं चित्र का?’ असा प्रश्न पडतो- पण या तरुणीचा पोशाख तर ‘नाही- प्रात्यक्षिक नव्हे हे’ असंच जणू सुचवत असतो.. मग तशाच पोशाखातलं आणि तशाच रंगांतलं दुसऱ्या तरुणीचं चित्रही दिसतं.. या दोन्ही दाक्षिणात्य सुंदरी कुठे तरी प्रवासात दिसल्या असाव्यात, असं प्रेक्षक म्हणून आपणच परस्पर ठरवतो आणि पुढल्या चित्राकडे वळतो.. असा हा दृश्य खेळ!

‘जहांगीर’ हे सर्व लोकांचं सदासर्वकाळ स्वागतच करणारं दालन आहे.. त्यामुळे हे प्रदर्शन पाहायला कुठलीही आडकाठी नाही. सोबत समोरच्याच ‘सभागृह दालना’त मूळ बांगलादेशचे चित्रकार शहाबुद्दीन अहमद यांचं चित्रप्रदर्शन भरलं आहे, त्यांमधली चित्रं मानवी सौष्ठव आणि वेग-आवेग यांचं दर्शन घडवतात.. तेही आवर्जून पाहाच.