16 December 2017

News Flash

गॅलऱ्यांचा फेरा : ‘जहांगीर’ला पर्याय नाही!

‘जहांगीर’च्या दुसऱ्या प्रदर्शन-दालनात सुधीर पटवर्धन यांची नवी चित्रं पाहायला मिळताहेत.

छाया डोळस | Updated: October 5, 2017 3:17 AM

जतिन दास यांची चित्रं

नव्या आणि तरुण चित्रकार/ शिल्पकारांच्या कलाकृती जहांगीर आर्ट गॅलरीत पाहायला मिळणं, हा आनंदाचा आणि नव्या कलावंतांकडून त्यांच्या कलाविषयक कल्पना समजून घेण्याचा भाग असतोच; पण एकंदर चार दालनं असलेल्या या सार्वजनिक (ट्रस्टच्या मालकीच्या) गॅलरीत एकाच वेळी चौघा सुपरिचित चित्रकारांची प्रदर्शनं भरलेली असल्यास लक्षात येतं की, मुंबईत कितीही कलादालनं उभी राहिली तरी, यंदा पासष्टाव्या वर्षांत असलेल्या ‘जहांगीर’ला पर्याय नाही! ज्येष्ठ, श्रेष्ठ, नवोदित, संघर्षशील, शहरी, ग्रामीण अशा सर्वच दृश्यकलावंतांची प्रदर्शनं इथं भरतात.. ‘जहांगीर आर्ट गॅलरीची निवड समिती काय करते काय?’ असा कुरबुरीचा सूर असेलही आणि त्यामधल्या आक्षेपात तथ्यही असेल; पण असे आक्षेप घ्यायला जागा आहे, म्हणून तर सर्व रंगांच्या, सर्व छटांच्या चित्रकारांना ‘जहांगीर’मध्ये संधी मिळते आहे.

चारही दालनांत ज्येष्ठांची प्रदर्शनं भरलेली असताना, या सर्व ज्येष्ठांची ‘शैली’ कुठे कायम राहिली आणि त्यांच्या चित्रांमध्ये नेमकं काय बदललं याबद्दलचं कुतूहल समीक्षकांना असणं साहजिकच आहे. ‘शैली’च्या नावाखाली हे ज्येष्ठ चित्रकार स्वत:चीच पुनरावृत्ती तर करत नाहीत ना, अशी अढीसुद्धा असणं ठीकच म्हणावं लागेल! कोण अधिक ताजं आणि कोण तेच ते करणारं, या मोजपट्टीवर एक क्रम लावून पाहण्याचा खेळ या चौघांपुरताच खेळणं कदाचित अन्यायकारक ठरेल, पण तरीही आपसूकपणे ज्या दृश्यकलावंतांनी ताजेपणा टिकवला, त्यांनाच महत्त्व मिळणार हे उघड आहे.

चित्रविषयाच्या पलीकडे..

‘जहांगीर’च्या दुसऱ्या प्रदर्शन-दालनात सुधीर पटवर्धन यांची नवी चित्रं पाहायला मिळताहेत. या चित्रांमधले विषय शहरातल्या अनुभवांवर आधारित आहेत, पण मानवी जीवनाबद्दलचं चिंतन हाच डॉ. पटवर्धनांचा व्यापक विषय आहे, एवढं ही चित्रं पाहून लक्षात येईल. पण त्याहीपेक्षा कितीतरी अधिक गोष्टी, ही चित्रं पाहताना जाणवत राहतील. दोन चित्रांमध्ये चित्रकाराची आरशातली प्रतिमा आहे. एकात आरशासमोर उभं राहून तो स्वत:चा फोटो (सेल्फी नव्हे) टिपतो आहे, तर दुसऱ्यात कॅमेरा चित्रकाराच्या मागे आहे. अन्यही अनेक चित्रं आहेत : घरातल्या दोन माणसांची आणि जणू अस्तित्ववादी एकटेपणा अधोरेखित करणाऱ्या मधल्या अंतरांची चित्रं, माणसांचा वावर असलेल्या अन्य वास्तूंमध्ये (उदाहरणार्थ रुग्णालय) उरलेल्या अनुभवांचं दृश्यभासांमध्ये रूपांतर करणारी चित्रं, शहरात कुठे ना कुठे दिसलेल्या माणसांमधून त्याच सामाजिक/ आर्थिक परिस्थितीतल्या बाकीच्या कैक माणसांचाही वेध घेऊ पाहणारी अनामिक व्यक्तिचित्रं.. किंवा ‘प्रवृत्तीचित्रं’!

पण ही यादी विषयांचीच झाली. त्याही पलीकडे आपण काहीतरी नक्कीच पाहिलेलं आहे. ते काय आहे?

एकाच सपाट प्रतलावर बदलत जाणाऱ्या मिती पाहिल्या आहेत. हा पटवर्धन यांच्या ‘शैली’चा भाग, असं म्हणता येईल.. पण ही शैली दिवसेंदिवस अधिक सशक्त कशी होत गेली, ते या प्रदर्शनातून दिसेल. ‘मध्यभागी खांबासारखं काहीतरी आणि त्याच्या दोन्ही बाजूंना एक जवळचं आणि एक थोडं लांबचं दृश्य’ अशी रचना तर पटवर्धनांनी १९८०च्या दशकातही केलेली आहेच, पण आता या रचनेत ‘जवळ आणि थोडं लांब दिसणाऱ्या दृश्यांच्या मध्यभागी दार किंवा पॅसेज.. त्याहीपलीकडे अधिक लांबचं काहीतरी’ असा फरक झालेला आहे. शिवाय वस्तुचित्रण, निसर्गचित्रण, व्यक्तिचित्रण यांच्या इतिहासातून दिसणाऱ्या नमुन्यांपैकी अव्वल कोणते, अनवट कोणते, हे शोधून त्यांना आपल्या चित्रामधून प्रतिसाद देण्याची सुरुवात तर पटवर्धनांनी आधीपासूनच केली होती. पण ताज्या चित्रांमध्ये, ते प्रतिसाद एकजीव झालेले दिसतील.

वरचा परिच्छेद वाचून, ‘म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारणारे काही जण असणारच. त्यांच्यासाठी उत्तर असं की, जर पटवर्धनांबद्दल निघालेलं सचित्र मराठी पुस्तक (लेखक : प्रभाकर कुलकर्णी) पाहिलंत, तर महाराष्ट्रात आधुनिकतावाद रुजवू पाहणाऱ्या पटवर्धनांची दृश्य-वैशिष्टय़ं उमगतील. ते पुस्तक प्रदर्शनानंतर पाहिलंत, तरीही आपण पाहिलेलं

प्रदर्शन या चित्रांपेक्षा किती आणि कसं निराळं होतं हेही समजेल.

‘जहांगीर’मध्येच पहिल्या प्रदर्शन- दालनात शशी बने यांची चित्रं आहेत. ‘कलरिस्ट’ किंवा ‘रंगप्रभू’ चित्रकार ना. श्री. बेन्द्रे यांच्या शैलीचा वारसा पुढे नेताना बने यांनी, कमीत कमी फटकाऱ्यांत कापडावरल्या डिझाइनचा अभास निर्माण करण्याच्या तंत्रात बाजी मारली, असं या प्रदर्शनातून लक्षात येईल. बने यांची कर्मभूमी असलेल्या वसई-अर्नाळा परिसरातली ही चित्रं आहेत. त्याखेरीज, मुंबईच्या अमूर्तचित्रांची परंपरा चालवणाऱ्या विप्ता कपाडिया यांची चित्रं ‘जहांगीर’च्या तिसऱ्या प्रदर्शन-दालनात पाहाता येतील.

..आणि जतिन दास!

मुंबईत (‘जेजे’मध्ये)  शिकलेले पण दिल्लीत वाढलेले आणि ‘पद्मभूषण’ किताब (२०१२) मिळवलेले चित्रकार जतिन दास यांचं प्रदर्शन, हे ‘जहांगीर’मधलं याच आठवडय़ातलं आणखी एक आकर्षण. जतिन दास यांची चित्रं फार बदललेली नाहीत. चेहरा, हातापायांची बोटं नीटस चितारून मधले अवयव गोल, त्रिकोण, चौकोन या आकारांकडे झुकणाऱ्या जोरकस रेषांमधून सूचित करणं, ही दास यांची खासियत. ती मुंबईच्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’त (एनजीएम) २०१० साली भरलेल्या त्यांच्या सिंहावलोकनी प्रदर्शनात जशी दिसली होती, तशीच इथेही दिसेल.

पण या प्रदर्शनाच्या निमित्तानं, जतिन दास यांच्याशी जाहीर कार्यक्रमाद्वारे संवाद साधण्याची संधी भायखळ्याच्या राणीबाग परिसरातल्या ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’नं येत्या सोमवारी- ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता- देऊ केली आहे. तिथं दास यांचे आणखी पैलू समजतील. त्यांचं बोलणं काहीसं नाटय़मय परिणाम साधणारं असतं यात शंकाच नाही (अवांतर माहिती : अभिनेत्री नंदिता दास त्यांची कन्या). पण अनेक र्वष ठिकठिकाणचे हातपंखे त्यांनी जमवले आणि त्यांचं कायमस्वरूपी संग्रहालयच भुवनेश्वर शहरातल्या स्वत:च्या ‘जेडी आर्ट सेंटर’मध्ये उभारलं. त्यामुळे प्रदर्शन कसंही वाटलं, तरी हा माणूस माहीत करून घ्यायला हवा!

First Published on October 5, 2017 3:17 am

Web Title: jehangir art gallery art gallery in mumbai