दंशामुळे इजा होण्याची भीती; पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

सुमारे पंधरवडय़ाच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर जाण्याचे बेत आखत असाल तर, सावधान! आपल्या दंशाने मानवाला इजा पोहोचवणारे जेली फिश मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दाखल होऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत जुहू समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणात ‘ब्लू बॉटल’ या जेली फिशच्या विषारी प्रजाती आढळल्या असून तज्ज्ञांनी पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जुहू समुद्रकिनाऱ्यावर काही भागांत जीवरक्षक सुनील कनोजिया यांना हे जेली फिश आढळून आले आहेत. ब्लू-बॉटल जेलीफिश पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर नावानेही  ओळखले जातात. हा मासा समूहाने समुद्रात वावरतो. गेल्या काही वर्षांत जेली फिशचं समुद्र किनारी येण्याचं प्रमाण वाढत आहे.  याआधी आठवडय़ाभरापूर्वी गिरगाव चौपाटीवर ब्लू-बॉटल जेलीफिश ही विषारी माशांची प्रजात आढळून आली होती. पावसाळ्यापूर्वी हे जलचर  वाऱ्याच्या प्रवाहामुळे मध्य अरबी समुद्रातून पश्चिम अरबी समुद्रकिनाऱ्यावर येतात. गेले दोन दिवस वेगाने वारे वाहात असून त्यासोबत वाहणाऱ्या प्रवाहांतून हे जलचर समुद्रकिनारी आले आहेत.

ब्लू-बॉटल जेली फिशच्या शुंडकांवर ‘निमॅटो फोर्स’ नावाच्या पेशी असतात. त्यामध्ये विष भरलेलं असतं.

या फिशचा एखाद्या माणसाला स्पर्श होतो, तेव्हा त्याच्या पेशीतल्या विषाचा त्याला दंश होतो. या वेळी दंश झालेली जागा लाल होते, तसेच खाज सुटते.

गेल्या वर्षी जुहू समुद्रकिनारी एका मुलीला या विषारी जेली फिशने दंश केला होता. तसेच यापूर्वी गणपती विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर जेली फिशने दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालिकेने याची आधीच खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सुनील कनोजिया यांनी सांगितले.

काय काळजी घ्याल?

  • जेली फिशचा दंश झाल्यावर प्रचंड वेदना होतात. अशा वेळी दंश झालेल्या ठिकाणी खाण्याचा सोडा लावावा. त्या भागावर वाळू चोळावी किंवा खरखरीत कपडय़ाने तो भाग घासावा, असा सल्ला सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूटचे माजी संशोधक डॉ. विनय देशमुख यांनी दिला आहे.
  • जेली फिश समुद्रकिनारी असल्यास त्या ठिकाणी पोहायला जाणे किंवा समुद्राच्या पाण्यातून फेरफटका मारण्याचे टाळावे, असेही त्यांनी सुचवले आहे.