जेट एअरवेजच्या वैमानिकांनी १ एप्रिलपासून काम थांबवण्याबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी ‘नॅशनल अ‍ॅव्हिएटर्स गिल्ड’ (एनएजी) या वैमानिकांच्या संघटनेने रविवारी १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलले. यामुळे विविध समस्यांशी झुंजणाऱ्या जेट एअरवेजमधील मोठे संकट तात्पुरते तरी टळले आहे.

रविवारी दुपारी मुंबई व दिल्ली या दोन्ही ठिकाणी झालेल्या एनएजी सदस्यांच्या खुल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेच्या एका सूत्राने सांगितले. जेट एअरवेजमधील एकूण १६०० पैकी सुमारे ११०० वैमानिकांचे आपण प्रतिनिधित्व करत असल्याचा एनएजीचा दावा आहे. वेतनाची थकबाकी न देण्यात आल्यास, तसेच यापुढील वेतनाबाबतची स्थिती ३१ मार्चपर्यंत स्पष्ट न करण्यात आल्यास आपले सदस्य १ एप्रिलपासून काम करणार नाहीत, असे या संघटनेने गेल्या महिन्यात जाहीर केले होते. जेट एअरवेजमधील वैमानिक, अभियंते आणि व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी यांचे वेतन गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून अनियमित स्वरूपात मिळत आहे.