दिल्लीहून मुंबईला येणारे विमान मुंबई विमानतळावर उतरत असताना या विमानाचा लँडिंग गीअर अडकला. त्यामुळे या विमानाचा मागील भाग धावपट्टीला घासला. मात्र अखेर हे विमान सुखरूप उतरले असले, तरी विमानातील १२७ प्रवासी बालंबाल बचावले. या घटनेमुळे गुरुवारी दिवसभर विमानांची वाहतूक विस्कळीत झाली होती.
जेट एअरवेजचे ९डब्ल्यू३५४ हे दिल्लीहून मुंबईला येणारे विमान रात्री दहाच्या सुमारास मुंबई विमानतळावर उतरत असताना या विमानाचा लँडिंग गीअर अडकला. त्यामुळे विमानाचे चाक बाहेर आले नाही आणि विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आपटला. हे विमान थोडे अंतर जाऊन थांबले आणि विमानातील १२७ प्रवाशांना कोणतीही दुखापत न होता हे प्रवासी बचावले. मात्र या अपघातामुळे धावपट्टी खराब झाली. रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारी सकाळीही हे विमान बाजूला करण्याचे काम चालू होते. जेट एअरवेजच्या तंत्रज्ञांनी पाहणी केली असता प्राथमिक अंदाजानुसार या गीअरचा हाऊसिंग बोल्ट बिघडल्याने हा लँडिंग गीअर अडकल्याचे समजत आहे. अखेर हे विमान बाजूला घेऊन ते टॅक्सीवे क्रमांक एन९ येथे उभे करण्यात आले.