वांद्रयाच्या भाभा हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास एक २२ वर्षीय तरुण विचित्र जागेचे दुखणे घेऊन आला होता. या तरुणाच्या गुदद्वारामध्ये सहा इंचाचा जेट स्प्रे अडकला होता. तत्काळ अपघात कक्षात आलेला हा तरुण अक्षरश: वेदनेने विव्हळत होता. त्याला गुदद्वाराच्या भागात प्रचंड वेदना होत होत्या. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नेमकं कशामुळे हे घडलं असा प्रश्न त्याला केला. त्यावर त्याने अपघाताने जेट स्प्रे आतमध्ये जाऊन अडकल्याचे सांगितले. परंतु नंतर त्यानं खरं कारण सांगितलं. तरुणाला गुदद्वारात अशा उपकरणांद्वारे लैंगिक सुख घेण्याची विकृती जडली होती. त्यातूनच ही दुर्घटना घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. केवळ सुदैव म्हणून आतमध्ये गंभीर इजा झाली नव्हती. डॉक्टरांना गुंगीचे औषध देण्याची किंवा शस्त्रक्रियेची गरजही पडली नाही. त्यांनी अर्ध्या तासाच्या आत अडकलेला स्प्रे बाहेर काढला.

डॉक्टरांनी त्या युवकाचे समुपदेशन केले व अशा प्रकारची कृती धोकादायक असल्याचे त्याला पटवून दिले. वेळेत तो स्प्रे बाहेर काढला नसता तर रुग्णाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता होती असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

याच आठवडयात डॉक्टरांनी आणखी एक अशाच प्रकारची केस हाताळली. ज्यामध्ये एका नवविवाहित महिलेला अशाच प्रकारचा त्रास झाला होता. डॉक्टरांना या महिलेवर छोटीशी शस्त्रक्रिया करुन टाके घालावे लागले. त्या महिलेला प्रचंड त्रास होत होता, पण ती सांगायला संकोच करत होती. अखेर तिने सासूमार्फत तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले, असे डॉक्टर विनोद खाडे यांनी सांगितले. गुदद्वाराचा मार्ग हा फक्त विष्ठा बाहेर टाकण्यासाठी आहे. लैंगिंक सुखासाठी अशी उपकरणं वापरल्यास गुदद्वारातले स्नायू फाटून जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले.