aishwarya-kalyan-759सुप्रसिद्ध कल्याण ज्वेलर्सने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतची वादग्रस्त जाहिरात अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.  कल्याण ज्वेलर्सच्या एका जाहिरातीच्या पोस्टरमध्ये सौंदर्यवती ऐश्वर्याचे शाही अंदाजातील दागिन्यांनी नटलेले रुप दाखविण्यात आले आहे. मात्र, ऐश्वर्याच्या मागे तिच्या डोक्यावर छत्री घेऊन एका लहान मुलाचे चित्र देखील छापण्यात आले होते. जाहिरातीत वर्णद्वेश बाळगण्यात आला असून ऐश्वर्याच्या सौंदर्याला अनुसरून या मुलाचे स्वरुप मुद्दाम क्षीण दाखविण्यात आले आहे. तसेच आपल्या जाहिरातीतून ज्वेलर्सने बालमजुरीला प्रोत्साहन देण्याच काम केले आहे, असा आरोप करत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षांनी जाहिरातीवर आक्षेप नोंदवला होता.
याची दखल घेत कल्याण ज्वेलर्सने आपल्या फेसबुक पेजवर जाहिरातीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. तर, खुद्ध ऐश्वर्यानेही आपल्याला पूर्वकल्पना न देताच कल्याण ज्वेलर्सकडून जाहिरात बदलण्यात आली होती, असे स्पष्टीकरण दिले आहे.
आमच्या उत्पादनाचा सुरेखपणा, शाही अंदाज आणि चिरंतर सौंदर्य दाखविण्याच्या उद्देशातून ही जाहिरात तयार केली होती. मात्र, यातून अनवधानाने आमच्याकडून कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या भावना दुखावल्या असतील याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या जाहिरात मोहिमेतून हे पोस्टर मागे घेण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण कल्याण ज्वेलर्सच्या फेसबुक पेजवर देण्यात आले आहे.