ठाणे जिल्ह्य़ातील वाडा भागात असलेल्या स्वराज ज्वेलर्सवरील दरोडय़ात झांबुआ टोळीचा सहभाग असल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी झांबुआ टोळीच्या दोघांसह एका गावकऱ्यास अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या जुवानसिंग आणि त्याचे सात साथीदार अद्याप फरार आहेत. या टोळीने नाशिक, पुणे, धुळे, जळगाव या जिल्ह्य़ांसह मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा परिसरात पेट्रोल पंप तसेच ज्वेलर्सच्या दुकानांवर दरोडा टाकल्याचेही तपासात उघड झाले आहे.
प्रकाश कडव (२८), जेलू केगू वसुनिया (३०) आणि दिनेश सकरिया चारेल (२५) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील प्रकाश हा वाडा भागातील रहिवासी आहे तर जेलू आणि दिनेश हे दोघे मध्य प्रदेशातील झांबुआ टोळीचे सदस्य आहेत.
जुलै २०१३मध्ये वाडा बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या स्वराज ज्वेलर्सवर पाच ते सात व्यक्तींनी दरोडा टाकून साडेदहा लाखांचा ऐवज लुटला होता.
या दरोडेखोरांची कार्यपद्धत झांबुआ टोळीप्रमाणेच असल्याचे निदर्शनास येताच जुवानसिंगची माहिती घेतली. त्या वेळी कल्याण येथील आधारवाडी कारागृहातून त्याची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच सुटका झाल्याचे समजले. तसेच प्रकाशही एका गुन्ह्य़ात याच कारागृहात बंदिस्त असताना तो जुवानसिंगच्या बॅरेकमध्ये होता. त्यामुळे या दोघांची चांगली ओळख होती. यातूनच प्रकाशने या टोळीला स्वराज ज्वेलर्सचे दुकान आणि तेथून पळून जाण्याचा मार्ग दाखविल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी दिली.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने झांबुआ टोळीतील जेलू आणि दिनेश या दोघांना अटक केली. यातील जेलू हा झांबुआ येथील कारागृहातून पळाला असून स्थानिक पोलीसही त्याच्या शोधात होते. तसेच जुवानसिंग आणि त्याचे उर्वरित साथीदारही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.