अभिनेत्री जिया खान हिचा खून करण्यात आल्याच्या आरोपाचाही तपास करा आणि त्यासाठी तिच्या आईचा नव्याने जबाब नोंदवा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर जियाची आई राबिया खान यांचा जुहू पोलिसांनी शनिवारी जबाब नोंदविला. त्या वेळेस राबिया यांनी सूरज पांचोली याच्याकडे संशयाची सुई वळवत जियाने आत्महत्या नव्हे, तर तिचा खून करण्यात आल्याचा आणि तोही तिच्या ‘खूप जवळच्या’ व्यक्तीने केल्याचा दावा केला.
जियाने स्वत: गळफास लावून आत्महत्या केलेली नाही, तर तिचा खून केल्यानंतर त्याला आत्महत्येचे रुप देण्यात आल्याचा आरोप करीत राबिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांची न्यायालयानेही गंभीर दखल घेत जियाचा खून झाला असल्याच्या आरोपाचाही तपास होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आणि त्या दिशेने पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार राबिया यांनी जुहू पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला.उच्च न्यायालयातील याचिकेत केलेला दावा राबिया यांनी जबाब नोंदविताना केला आणि दाव्याच्या पुष्टीसाठी आवश्यक छायाचित्रे सादर केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.