तुटलेल्या पिंजऱ्यांमुळे बाहेरील पक्ष्यांचेही बिनधास्त वास्तव्य

विदेशी किंवा वैशिष्टय़पूर्ण प्राणी-पक्ष्यांचे दर्शन घडवण्यासाठी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे (राणीची बाग) नूतनीकरण करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. मात्र, या ठिकाणी सध्या येणाऱ्या पर्यटकांना मात्र पक्षिसंग्रहालयात कावळे, गायबगळे असे ‘पाहुणे’ पक्षीही पाहायला मिळत आहेत. पक्षिसंग्रहालयातील तुटलेल्या पिंजऱ्यांमुळे स्वच्छंद विहार करणारे पक्षीही घटिकाभर या पिंजऱ्यांत घुसखोरी करून येथील पक्ष्यांच्या खाद्यावर ताव मारत असल्याचे चित्र दिसत आहे.

राणीच्या बागेचा कायापालट करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक पावले उचलण्यात आली. दुर्मीळ किंवा कमी दिसणारे प्राणी-पक्षी येथे आणून पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रशासनाने नवीन पिंजरे उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, सध्या येथे असलेल्या पिंजऱ्यांची पार दुरवस्था झाली आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरताच उजव्या बाजूला या पक्ष्यांचा मोठा पिंजरा आहे. त्यामध्ये रंगीत करकोचा, कांडेसार, सारस क्रोंच, रातबगळा, गुलाबी झोळीवाला कुरव, काळा शराटी, राखी बगळा, करकोचा आणि आफ्रिकन क्राऊन क्रेन यांसारखे पाणपक्षी आहेत. मुख्य म्हणजे रातबगळा आणि रंगीत करकोचा पक्षी या ठिकाणीच प्रजनन करत असून त्यांची घरटी पिंजऱ्यांमध्ये आहेत. मात्र असे असूनही या पक्ष्यांच्या अधिवासाची प्रशासनाकडून काळजी घेतली जात नाही.

पिंजऱ्याची जाळी ठिकठिकाणी तुटली आहे. शिवाय पिंजऱ्याच्या छताचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने त्यामाग्रे रातबगळे पिंजऱ्याबाहेर पडले असून संग्रहालयामध्ये त्यांच्या विहार सुरू आहे. शिवाय कावळे पिंजऱ्यामध्ये शिरून पाणपक्ष्यांसाठी घातलेल्या माशांवर डल्ला मारताना दिसतात. विशेष म्हणजे यापूर्वी पिंजऱ्यामध्ये अस्तिवात नसणारे गायबगळा आणि वंचक प्रजातीचे पक्षीही आयत्या मिळणाऱ्या खाद्यामुळे पिंजऱ्यामध्ये मुक्काम ठोकून आहेत.

‘राणीबागेच्या नूतनीकरणापेक्षाही येथील प्राण्यांच्या अधिवासाची काळजी घेणे आवश्यक आहे. कोटय़वधी रुपये खर्चून नवीन प्राणी आणण्यापेक्षाही सद्य:स्थितीत प्राण्यांच्या पिंजऱ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे,’ असे मत शहराचे मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू यांनी व्यक्त केले. पाणपक्ष्यांच्या पिजऱ्यांचे छत पडल्यास त्याखाली येऊन पक्षी दगावण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

नूतनीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याने पाणपक्ष्यांच्या पिंजऱ्याची तात्पुरती स्वरुपात दुरुस्ती केली जाणार आहे. नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर हा पिंजरा पाडण्यात येईल.

डॉ. संजय त्रिपाठी, संचालक- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय