नालासोपारा परिसरातील वालईपाडा भागात शुक्रवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करीत एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.नालासोपारा येथील वसंतनगरी भागात सत्यम जीवनदन गुप्ता (२०) राहातो. त्याने वालईपाडा भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला प्रेमाची मागणी घातली होती. पण, त्या मुलीने त्यास नकार दिला होता. त्यामुळे सत्यम संतापला होता. यातूनच शुक्रवारी सायंकाळी तो तिच्या घरी गेला आणि त्याने तिच्यावर गळ्यावर व हातावर चाकूने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या हल्ल्यानंतर सत्यमने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यालाही नालासोपारा परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.