आमच्यापेक्षा रेडिओ जॉकी मलिष्का नशीबवान आहे. कारण मुंबईच्या नालेसफाईबाबत तिने एक गाणं केलं त्यानंतर प्रशासकीय अधिकारी तिला घेऊन नाल्यांवर गेले. सफाई कशी होते ते दाखवलं. त्यानंतर मलिष्काने सांगितलं की नालेसफाई कशी योग्य पद्धतीने झाली, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. मुंबईत दोन वेळा नालेसफाईची गरज असताना ती केली जात नाही असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. आत्तापर्यंत आमदारांना कधीही प्रशासनाने नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी नेलं नाही. मात्र मलिष्काला घेऊन गेले त्यामुळे आमच्यापेक्षा ती भाग्यवान आहे असा टोला आव्हाड यांनी लगावला.
मुंबईतले सगळे नाले बिल्डर्सनी छोटे करून टाकले, त्यांना जबाबदार कोण? नैसर्गिक स्वच्छतेच्या ज्या जागा आहेत तेच भर टाकून बंद करण्यात आले तर मग मुंबई स्वच्छ कशी होणार? दरवेळी प्रचंड पाऊस मुंबई जलमय ही बातमी आपण किती वर्षे वाचणार आहोत एका पावसाने उद्धवस्त होणारं जीवन आपण जर लोकांना देत असू तर आपली नैतिक जबाबदारी काय? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. मुंबईत पाणी भरण्याच्या जागा वर्षानुवर्षे त्याच आहेत. मलिष्का एक गाणं करते मुंबई तुझा माझ्यावर भरवसा नाही का? तिला नालेसफाईच्या आढावा घेण्यासाठी नेलं जातं आमदारांना मात्र आयुक्त कोणताही आढावा घेण्यासाठी घेऊन जात नाही हे दुर्दैवी आहे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार आहेत नालेसफाईचे टेंडर कधी काढायचे? हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. पावसाळ्याच्या आधी एक महिना टेंडरची प्रकिया सुरू करायची आणि पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईला सुरूवात करायची हे दरवेळीच घडतं. नालेसफाईमध्ये जेसीबी किंवा पोकलेन उतरवली जाते, तो सगळा कचरा आणून नाल्यावर ठेवला जातो. आपण कंत्राटदाराला कितीही सांगा तो कचरा उचल म्हणून पण तो कंत्राटदार कचरा उचलत नाही. ओला कचरा आहे मी काही करू शकत नाही असे म्हणून तो कानावर हात ठेवतो मग कचऱ्याचे ढिग साठतात. तो कचरा उचलण्याचा वेग कमी करतो. पण दाखवतो असं की नालेसफाई जोरात सुरू आहे. मग जोरात पाऊस आला की कचऱ्याचे ढिग वाहून जातात. मग तो बिलं घ्यायला मोकळा असा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनावर निशाणा साधला आहे.
एवढंच नाही तर मुंबईतले काही नाले हे १० ते १२ फूट खोल आहेत. मात्र त्यांची सफाई तीन फुटांपर्यंतच केली जाते असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. दोनवेळा नालेसफाई का केली जात नाही? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 1:18 pm