25 October 2020

News Flash

आव्हाडांच्या वाटय़ाला डावखरेंचे निवासस्थान

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे अनेकदा या बंगल्यात बैठकांना उपस्थित राहात असत.

जितेंद्र आव्हाड

मुंबई : ठाण्याच्या राजकारणात दिवंगत वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड यांचे संबंध सर्वश्रुत होते. परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसत. डावखरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राबरोबरही हा वाद कायम राहिला. विधान परिषदेचे उपसभापती असताना डावखरे यांचे १८ वर्षे वास्तव्य असलेले मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानच मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या आव्हाड यांच्या वाटय़ाला आले आहे.

राज्य मंत्रिमंडळात गृहनिर्माण खाते मिळालेल्या आव्हाड यांना मंत्रालयासमोर बंगल्याचे वाटप झाले होते; परंतु तो बंगला राष्ट्रवादीचेच हसन मुश्रीफ यांनी ताब्यात घेतला. यावरून आव्हाड आणि मुश्रीफ यांच्या सचिवांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. शेवटी ते निवासस्थान मुश्रीफ यांच्याकडे कायम ठेवण्यात आले. आव्हाड यांना मंत्रालयासमोरील ए-३ हे शासकीय निवासस्थान देण्यात आले. विधान परिषदेचे उपसभापतिपदी असताना वसंत डावखरे यांचे तब्बल १८ वर्षे ए- ३ या शासकीय निवासस्थानी वास्तव्य होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या बंगल्यातच पक्षाच्या बैठका होत असत. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे अनेकदा या बंगल्यात बैठकांना उपस्थित राहात असत. १९९८ ते २०१६ या काळात हे निवासस्थान डावखरे यांच्याकडे होते. डावखरे यांचे पद गेल्यावर हे निवासस्थान माजी राज्यमंत्री मदन येरावार यांना देण्यात आले होते. नव्या वाटपात आव्हाड यांना हे निवासस्थान मिळाले. डावखरे आणि आव्हाड यांच्यातील वाद हा राष्ट्रवादीत नेहमीच चर्चेचा विषय होता. दोघेही नेते शरद पवार यांच्या निकटचे मानले जात असत. उभयतांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न पवारांनी केला होता, पण डावखरे आणि आव्हाड यांच्यातील कटुता कधीच दूर होऊ शकली नाही. डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र निरंजन यांच्याशीही आव्हाड यांच्यातील बेबनाव कायम राहिला. कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत आव्हाडांकडून दगाफटका होऊ शकतो यामुळेच निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात, निरंजन डावखरे हे निवडून आले होते. ‘मंत्रालयासमोरील ए- ३ हे शासकीय निवासस्थान आपल्या वाटय़ाला येणे हा योगायोग समजावा लागेल. पक्षाच्या बैठका आणि अनेक महत्त्वाचे निर्णय या निवासस्थानी झाले होते. पुढेही हाच कल कायम राहील,’ अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 3:08 am

Web Title: jitendra awhad get home of vasant davkhare zws 70
Next Stories
1 सत्तापालटानंतर इतिहासाच्या पुस्तकात नवे बदल?
2 गॅस गीझरमुळे गुदमरून मुलीचा मृत्यू
3 टॅक्सींवरील इंडिकेटरला संघटनांचा विरोध
Just Now!
X