ठाण्यातील बेकायदा बांधकामांविषयी कळवळा व्यक्त करायची एकही संधी सोडायची नाही, असा जणू पण केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा शहरात उभ्या राहिलेल्या बेकायदा इमल्यांना अभय देण्याची मागणी करत महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांना जाहीर आव्हान दिले. नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेले बेकायदा मजले पाडले जातील, अशी घोषणा गुप्ता यांनी करताच आव्हाड यांनी हे मजले पाडू दिले जाणार नाहीत, असा पवित्रा घेतला आहे. अशा प्रकारच्या २०० इमारतींवर कारवाई करण्याची योजना आयुक्तांनी आखली आहे. त्यावर एकाही मजल्याला हात लावू दिला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला.
कळव्यातील अन्नपूर्णा या इमारतीवर बेकायदा पद्धतीने मजले वाढविण्यात आल्याने मूळची अधिकृत असलेली ही इमारत पुढे अनधिकृत ठरली. या बेकायदा मजल्यांचा भार असह्य़ झाल्याने काही दिवसांपूर्वी ती कोसळली. ग्रामपंचायतीच्या काळात ठाण्यात शेकडोंच्या संख्येने इमारती उभ्या राहिल्या असून त्यानंतर या इमारतींवर अतिरिक्त बेकायदा मजले चढविण्यात आले आहेत. संरचनात्मक अभियंत्यांच्या दाखल्याशिवाय उभे करण्यात आलेल्या या मजल्यांवर शेकडो इमारती धोकादायक ठरू लागल्या आहेत. अशा इमारतींमधील बेकायदा मजले तातडीने पाडावे लागतील, अशी भूमिका महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडली. मात्र, बेकायदा बांधकामाच्या प्रश्नावर राजकारण करण्यात पटाईत असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी आयुक्तांच्या भूमिकेला विरोध करत ‘एकही मजला पाडू दिला जाणार नाही,’ अशी भूमिका शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. केवळ कळव्यातच अशी बांधकामे नसून चरई तसेच नौपाडय़ातही अशा इमारती उभ्या राहिल्या आहेत. काही तत्कालीन आयुक्त, राजकारणी तसेच बडे अधिकारी यांच्या संगनमताने ही बेकायदा बांधकामे उभी राहिली असून या सर्व मोठय़ा अधिकाऱ्यांची आधी चौकशी करा, नंतरच मजले पाडा, असा पवित्रा आव्हाड यांनी घेतला.